
एखादे गुन्हेगारी प्रकरण किंवा दुर्घटना घडल्यानंतर सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभाग मनी लाँडरिंग व करचोरीविरुद्ध कारवाईचा बडगा उगारतात.लोकप्रतिनिधी, उद्योजक किंवा काही भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांची आर्थिक उलाढाल अवघ्या काही वर्षांत शंभरपटीने कशी वाढते? ही अफाट संपत्ती कोठून आली, याचा तपास यंत्रणांनी वेळीच केल्यास सार्वजनिक पातळीवरील भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो.
हल्लीच हडफडे येथील बर्च अग्नितांडव दुर्घटनेनंतर सक्तवसुली संचालनालय आणि आयकर खात्याने बर्च क्लबचे मालक गौरव लुथरा, सौरभ लुथरा, अजय गुप्ता यांच्यासह लोकप्रतिनिधी असलेले गावचे माजी सरपंच रोशन रेडकर आणि सरकारी सेवक असलेले बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर यांच्या मालमत्तांवर छापे टाकण्यात आले.
दिल्लीस्थित लुथरा बंधूंच्या ४२ कंपन्या बनावट असल्याचा तपास यंत्रणेचा संशय असून त्यादिशेने चौकशी सुरू आहे. एवढ्या मोठ्या संख्येने बनावट कंपन्या थाटून त्याद्वारे संशयित लुथरा बंधूंनी सरकारी महसूल बुडवण्यासोबतच शासकीय फसवणूक केली आहे. या कंपन्या बनावट असूनही त्याची कोणीही चौकशी केलेली नाही. लुथरा बंधूंचे दिल्लीतील प्रतिष्ठित भागातील जुने घर पाडून त्या ठिकाणी आलिशान महालवजा बंगला बांधला आहे. यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. तसेच रोमिओ लेनचे सहमालक अजय गुप्ता याचा याच वसाहतीमध्ये बंगला असून तिघेही अब्जाधीश आहेत. हा पैसा त्यांनी वरील बनावट कंपन्यांच्या माध्यमातून मिळवल्याचा संशय असूनही त्याचा कोणत्याही सरकारी यंत्रणांनी तपास केला नव्हता. मात्र बर्च दुर्घटनेनंतर त्यांच्या बनावटगिरीचे बिंग उघडे पडले आहे.
माजी सरपंच रोशन रेडकर आणि बडतर्फ सचिव रघुवीर बागकर यांच्याकडेही मोठी मालमत्ता असल्याचे बोलले जात आहे. रेडकर यांच्या हडफडेतील नवीन आलिशान बंगल्याची चर्चा आता सर्वत्र आहे. मागील १० वर्षांपासून ते पंचायत राजकारणात आहेत. शिवाय एकेकाळी सरपंच असलेले रघुवीर बागकर यांनी पंचायत सचिवाची नोकरी मिळवल्यानंतरत्यांच्या मालमत्तेत बरीच भर पडली.
कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांची बागकरवर मेहरबानी होती. कळंगुट मतदारसंघातील कळंगुट, हडफडे नागवा, पर्रा व आता (बडतर्फ होण्यापूर्वी) शिवोली मतदारसंघातील आसगाव ग्रामपंचायतीत तो सेवा बजावत होता. बागकर याच्या मयडेसह अनेक ठिकाणी मालमत्ता असून त्यांची चौकशी सक्तवसुली संचालनालय करत आहे. बर्च दुर्घटनेनंतर ही कारवाई सुरू आहे.
काही राजकीय नेते, सरकारी कर्मचारी, अधिकारी यांची मालमत्ता अवघ्या काही वर्षांमध्ये शंभरपट वाढते. एवढ्या झपाट्याने उत्पन्न वाढणारा कोणता स्रोत आहे, यावर सक्तवसुली संचालनालय, भ्रष्टाचार विरोधी पथक आणि आयकर खात्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी या विभागांची स्थापना झाली आहे; परंतु तसे होत नसल्याने जनतेची पिळवणूक करणार्या भ्रष्टाचारी लोकांचे फावले आहे.
- उमेश झर्मेकर