भक्तीशिवाय, तुम्ही जे काही कराल ते सामान्यच राहील. जेव्हा एखादी व्यक्ती जे काही करत आहे, त्या प्रति पूर्णपणे समर्पित असते, तेव्हाच महान गोष्टी घडतात.

सद्गुरू : सत्संग हा सत्याशी नाते जोडण्याचा मार्ग आहे. सत्याचे आपल्यासोबत नाते आहे, नाहीतर आपण अस्तित्वातच नसू. पण सध्या, तुमचे सत्याशी नाते नाही - हे समोरून असलेले एकतर्फी प्रेमप्रकरण आहे. तुम्ही जीवनाच्या कोणत्याही परिस्थितीतून जात असलात तरी, जर सत्यासोबत प्रेमप्रकरण नसेल, तर तुम्हाला वाटेल की, जीवन रोज तुमच्यावर बळजबरी करत आहे. एखाद्या गोष्टीत सखोल सहभाग नसेल, तर तुम्हाला अडकल्यासारखे आणि दुःखी वाटेल. एखाद्या सकाळी, तुम्हाला प्रश्न पडेल की, उठायचे तरी कशासाठी ? पण तुम्ही काहीतरी करून अशा एखाद्या गोष्टीला स्पर्श केलात जी तुम्ही निर्माण केलेली नाही, जर तुम्ही सत्याला स्पर्श केला, तर अचानक तुम्हाला उठून काम करावेसे वाटेल.
सत्याशी नाते विकसित करणे म्हणजे जे असत्य आहे त्याचा अंत करणे. तुमच्या जीवनात अनावश्यक असलेली किमान एक गोष्ट शोधण्यासाठी एक मिनिट घालवा आणि तिचा आजच अंत करा. जेव्हा मी ‘अंत करा’ असे म्हणतो, तेव्हा तुमचा बॉस, सासू किंवा शेजारी यांचा विचार करू नका. स्वतःच्या अशा गोष्टीचा अंत केला पाहिजे, जी तुमच्या जीवनासाठी अनावश्यक आहे. ‘मी माझ्या रागाचा अंत करेन’ असे काही म्हणणे खूप सर्वसामान्य ठरेल. तुम्ही एखाद्या गोष्टीचा अंत करत आहात, तर ती कायमची संपली पाहिजे आणि ती उद्या परत येऊ नये.
अशी गोष्ट ओळखा जिच्याशिवाय तुम्ही अधिक चांगले जगू शकाल, ज्याबद्दल आजच एखादे भक्कम पाऊल उचलू शकाल - ती गोष्ट कितीही लहान असली तरी चालेल. ‘मी भूतकाळात जगणार नाही, भविष्यात जगणार नाही, या क्षणात जगेन’ अशा सर्वसामान्य गोष्टी निवडू नका, कारण ही अशी गोष्ट नाही जी तुम्ही ठरवून साध्य कराल – त्यासाठी जागरूकता गरजेची आहे. एक लहान, पण ठरावीक गोष्ट निवडा, जी काहीही झाले तरी तुम्ही पुन्हा करणार नाही. असे काहीतरी – ‘मी रागाने शब्द उच्चारणार नाही.’ ‘मी रागावणार नाही’ म्हणणे खोटे ठरेल, कारण हे अजूनही तुमच्या नियंत्रणात नाही.
असे काही ठरवा जे तुम्ही करू शकता आणि कराल. अशा प्रकारे लहान पावले उचलून तुम्ही जीवन बदलू शकता. पण ते खरोखर केले पाहिजे – त्या गोष्टीने पुन्हा डोके वर काढू नये. तुम्हाला सत्यासोबत नाते विकसित करायचे असेल, तर जे सत्य नाही त्या गोष्टींमध्ये तुमची गुंतवणूक कमी झाली पाहिजे. कदाचित सर्व काही लगेच नाहीसे होणार नाही; पण तुम्ही ते टप्प्याटप्प्याने कमी केले पाहिजे. जीवनाकडे असे पहा की, काय बदलता येऊ शकते आणि त्याबाबत काहीतरी करा. ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्याबद्दल रडणे म्हणजे नक्कीच परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे धोरण आहे. तुम्ही असत्यामधील गुंतवणूक कमी केली, तर सत्य स्वतःहून उभारी घेईल. महिन्यातून किमान एकदा, प्रत्येक पौर्णिमेला, जागरूकपणे याकडे पहा आणि स्वतःमधील अशी एक लहान गोष्ट ओळखा जी तुम्हाला बदलायची आहे. जसे की, ‘प्रत्येक वेळी जेवणाआधी, मी माझ्या शरीराचा भाग होणाऱ्या अन्नाबद्दल १० सेकंद कृतज्ञता व्यक्त करेन’ किंवा, ‘प्रत्येक जीवनावश्यक घटक वापरताना, मग ती माती, पाणी किंवा हवा असो, त्यातील १ टक्के वाचवेन.‘ किंवा, ‘मी खाऊ शकेन एवढेच अन्न माझ्या ताटात घेईन.’ या लहान गोष्टी तुमचे जीवन बदलून तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवतील. जे सत्य नाही, जे तुमच्यासाठी चांगले नाही, ते जीवनातून खरोखर काढून टाका. जर हे मनावर घेतले, तर तुम्ही जीवनाचा एक मूलभूत धागा तयार कराल. नाहीतर, तुम्ही कोणत्याही पद्धतींचा अवलंब केलात, तरी ते फाटलेल्या कापडावरचे भरतकाम ठरेल. त्याचा काही उपयोग होणार नाही. तुमच्या जीवनाचा मूलभूत धागा नीट करण्याचे सर्वात सोपे मार्ग म्हणजे, एकतर जागरूकता निवडली पाहिजे, जे खूप कठीण काम आहे, किंवा भक्ती निवडली पाहिजे, जी सोपी आहे; पण वेगळ्याप्रकारे कठीण आहे. भक्ती ही 'हृदयहीन' गोष्ट आहे. तुमचे हृदय आता तुमचे राहिले नाही. तुम्ही ते विश्वभर उधळले आहे; पण भक्तीची ओढ तुमच्यामध्ये सतत धगधगते. तुम्ही भक्तीचा अग्नी धगधगता ठेवला, तर जागरूकता उभारी घेईल.
मुळात, भक्ती स्वतःला विसरण्याचे एक साधन आहे. तुम्ही स्वतःला विसरलात, तर स्वाभाविकपणे झोपेतही जागृत असाल. जर तुमच्या आत भक्तीचा अग्नी पेटू लागला आणि मी तुम्हाला एखादे लहान तंत्र दिले, तर ते एक विलक्षण प्रक्रिया म्हणून काम करेल. हा पाया नसेल, तर कोणतेही तंत्र किंवा पद्धत तुम्हाला खरोखर बदलू शकणार नाही. मग ते इनर इंजिनियरिंग, भाव स्पंदन किंवा सम्यमा असो, केवळ पद्धत किंवा तंत्राबद्दल कौतुक असणे पुरेसे नाही. जर तुम्ही जीवनाचा मूलभूत धागा योग्य जागी विणला, तरच हे अद्भुतपणे काम करेल.
अनेक लोकांना ‘भक्ती’ या शब्दाची अॅलर्जी असते, कारण त्यांना वाटते की, भक्ती म्हणजे मंदिरात किंवा चर्चमध्ये वगैरे जाणे. मला अपेक्षित असलेली भक्ती ही नाही. कोणत्याही स्त्रीने किंवा पुरुषाने, स्वतःच्या जीवनात करत असलेल्या कार्याला समर्पित असल्याशिवाय काहीही महत्त्वपूर्ण केले आहे का? भक्तीशिवाय, तुम्ही जे काही कराल ते सामान्यच राहील. जेव्हा एखादी व्यक्ती जे काही करत आहे, त्या प्रति पूर्णपणे समर्पित असते, तेव्हाच महान गोष्टी घडतात.
हे केवळ आध्यात्मिक प्रक्रियेसाठी लागू नाही. मग ते विज्ञान, क्रीडा, कला, संगीत किंवा इतर काहीही असो – जोपर्यंत लोक त्याकरिता जीवन समर्पित करत नाहीत, तोपर्यंत काहीही महत्त्वपूर्ण घडलेले नाही. तुम्हाला जे काही सार्थ वाटते, तुम्ही जीवनात ज्या गोष्टीला सर्वोच्च म्हणून पाहता, त्यासाठी स्वतःला समर्पित करा. जर तुम्ही हा आवश्यक धागा तयार केला, तर मी एक टाका घालू शकेन, आणि ती एक महान रचना बनेल.
(एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरू हे भारतातील पहिल्या ५० अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सदगुरूंना भारत सरकारतर्फे २०१७ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते ४ अब्ज लोकांपर्यंत पोहोचलेल्या कॉन्शस प्लॅनेट - सेव्ह सॉईल (माती वाचवा) या जगातील सर्वात मोठ्या लोकचळवळीचे आणि मिरॅकल ऑफ माईंड अॅपचेही संस्थापक आहेत, ज्याचे उद्दिष्ट ३ अब्ज लोकांना मानसिक कल्याणासाठी साधने उपलब्ध करून देणे हे आहे.)

- सद्गुरू
(ईशा फाऊंडेशन)