गुवाहाटीत चौकार-षटकारांचा पाऊस; भारताचा १० षटकांतच विजय

मालिकेत ३-० ने विजयी आघाडी : अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
25th January, 11:57 pm
गुवाहाटीत चौकार-षटकारांचा पाऊस; भारताचा १० षटकांतच विजय

गुवाहाटी : विश्वचषकाच्या आधी भारतीय संघाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धडकी भरवणारी कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने केवळ १० षटकांत १५५ धावांचे लक्ष्य गाठून ऐतिहासिक विजय मिळवला आणि ५ सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
हा सामना केवळ विजयापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो आधुनिक क्रिकेटमधील सर्वांत आक्रमक आणि धडकी भरवणाऱ्या धावसंख्येच्या पाठलागांपैकी एक म्हणून ओळखला जाईल.
१५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात धक्कादायक झाली होती. सलामीवीर संजू सॅमसन डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मात्र, त्यानंतर जे घडले ते क्रिकेटच्या इतिहासात क्वचितच पाहायला मिळते. इशान किशन, अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी किवी गोलंदाजीचा अक्षरशः धुव्वा उडवला. न्यूझीलंडने टाकलेली सर्वात ‘कंजूस’ षटक ११ धावांचे होती, यावरूनच भारतीय फलंदाजांच्या आक्रमकतेचा अंदाज येतो.अभिषेक शर्माचा विश्वविक्रम
अभिषेक शर्माने या सामन्यात केवळ १४ चेंडूत अर्धशतक झळकावून इतिहास रचला. २५ पेक्षा कमी चेंडूत सर्वाधिक वेळा (९ वेळा) अर्धशतक ठोकण्याचा जागतिक विक्रम त्याने आपल्या नावे केला. अभिषेकने २० चेंडूत ६८ धावांची झंझावाती खेळी केली, ज्यामध्ये ५ चौकार आणि ५ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीने चकित होऊन खुद्द न्यूझीलंडच्या खेळाडूंनी (कॉनवे आणि डफी) गमतीने त्याची बॅट तपासून पाहिली. किवी खेळाडूही अभिषेकच्या या खेळावर फिदा झाले होते.सूर्याचा ‘फिनिशिंग टच’
दुसरीकडे, कर्णधार सूर्यकुमार यादवनेही आपली ‘मिस्टर ३६०’ ही ओळख सार्थ ठरवली. त्याने १० व्या षटकात ग्लेन फिलिप्सला सलग दोन चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले आणि संघाला विजय मिळवून दिला. सूर्याने २६ चेंडूत ५७ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्यानेही २५ पेक्षा कमी चेंडूत ९ वेळा अर्धशतक करण्याच्या अभिषेकच्या विक्रमाशी बरोबरी केली.न्यूझीलंड पूर्णपणे हतबल
न्यूझीलंडने सामन्याच्या सुरुवातीलाच शरणागती पत्करली होती. भारतीय फलंदाजांनी पांढऱ्या कुकाबुरा चेंडूला मैदानाच्या चारी दिशांना धाडले. न्यूझीलंडचा संघ या हल्ल्याने इतका हादरला होता की, त्यांना हा सामना कधी संपतोय असे झाले होते.विश्वचषकापूर्वी प्रतिस्पर्ध्यांना इशारा
ज्या पद्धतीने भारताने १५४ धावांचे लक्ष्य अवघ्या ६० चेंडूत पार केले, ते पाहून क्रिकेट जगतातील दिग्गज थक्क झाले आहेत. ही केवळ विजयाची बातमी नसून भारतीय फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांच्या मानसिकतेवर केलेला हा प्रहार आहे.
१५०+ धावांचा पाठलाग सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवून मिळवलेले विजय
६० चेंडू – भारत विरुद्ध न्यूझीलंड, गुवाहाटी (२०२६)
३७ चेंडू – वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, किंग्स्टन (२०२४)
३३ चेंडू – इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, लाहोर (२०२२)
३२ चेंडू – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, जोहान्सबर्ग (२०१६)
सलग सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका विजय
११* – भारत (२०२४ ते सध्या सुरू)
११ – पाकिस्तान (२०१६ ते २०१८)
७ – भारत (२०१७ ते २०१८)
६ – भारत (२०१९ ते २०२१)
घरच्या मैदानावर सलग सर्वाधिक मालिका विजय
१०* – भारत (२०२२ ते २०२६)
८ – ऑस्ट्रेलिया (२००६ ते २०१०)
७ – भारत (२०१९ ते २०२२)
५ – पाकिस्तान (२००८ ते २०१८)