रणजी पुनरागमनात शुभमन गिल फ्लॉप

दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद, जडेजाही स्वस्तात माघारी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
रणजी पुनरागमनात शुभमन गिल फ्लॉप

राजकोट : रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या राज्य संघाकडून खेळताना दिसत आहेत. मात्र भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यासाठी हे पुनरागमन निराशाजनक ठरले. राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर सुरू असलेल्या सौराष्ट्र विरुद्ध पंजाब सामन्यात दोघांचीही कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्राचा संघ अवघ्या ४७.१ षटकांत १७२ धावांवर गारद झाला. सौराष्ट्रकडून जय गोहिल याने ११७ चेंडूत ८२ धावांची झुंजार खेळी केली. त्याला प्रेरक मंकड (३२) याने थोडी साथ दिली. इतर फलंदाजांमध्ये हार्विक देसाई (१३) आणि कोटत (१२) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला.
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रवींद्र जडेजा केवळ ६ चेंडूत ७ धावा करून बाद झाला. त्याला जेस इंदरने हरप्रीत ब्रारच्या हातून झेलबाद केले.
पंजाबकडून हरप्रीत ब्रार याने उत्कृष्ट गोलंदाजी करत ६ विकेट्स घेतल्या. जेस इंदरने २, तर प्रेरित दत्त आणि सन्वीर सिंग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
यानंतर फलंदाजीला उतरलेल्या पंजाबची सुरुवातही खराब झाली. हरनूर सिंग शून्यावर बाद झाला. मात्र प्रभसिमरन सिंग आणि उदय सहारन यांनी अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. उदय सहारन २३ धावांवर, तर नेहल वढेरा ६ धावांवर बाद झाला.
कर्णधार शुभमन गिल १९व्या षटकात फलंदाजीला उतरला. पण दुसऱ्याच चेंडूवर पार्थ भूतने त्याला आपल्या गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यामुळे गिलला रणजी पुनरागमनात शून्यावर माघारी परतावे लागले. प्रभसिमरन सिंग ४४ धावांवर बाद झाला. पंजाबचा संघ ४०.१ षटकांत १३९ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे सौराष्ट्राला ३३ धावांची आघाडी मिळाली.
गोलंदाजी करताना मात्र रवींद्र जडेजाने चांगली कामगिरी केली. त्याने रणवीर सिंग आणि हरप्रीत ब्रार यांना बाद करत २ विकेट्स घेतल्या. पार्थ भूत याने ५ विकेट्स घेत सामन्यात चमकदार कामगिरी केली. धर्मेंद्रसिंह जडेजानेही २ विकेट्स घेतल्या.व्यंकटेश अय्यरची ८७ धावांची खेळी
आलूर येथे झालेल्या सामन्यात मध्य प्रदेशने पहिल्या दिवसाअखेर ५ बाद २४४ धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने १२ चौकारांसह ८७ धावांची शानदार खेळी केली. यश दुबे आणि हिमांशू मंत्री यांनी ५० धावांची सलामी दिली. त्यानंतर अय्यर आणि शुभम शर्मा (३३) यांनी ७५ धावांची भागीदारी केली. पुढे अय्यर आणि रजत पाटीदार (३०) यांनीही अर्धशतकी भागीदारी केली. मात्र दोघेही २३३ या समान धावसंख्येवर बाद झाले. कर्नाटककडून व्यषक विजयकुमार आणि श्रेयस गोपाळ यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
तमिळनाडू ७ बाद २८१
प्रदोष रंजन पॉल (७८), आंद्रे सिद्धार्थ (५६), निधीश राजगोपाल (नाबाद ५४) आणि अथीश एस.आर. (५०) यांच्या अर्धशतकांमुळे तमिळनाडूने ७ बाद २८१ धावा केल्या. मात्र राजगोपाल वगळता कुणीही मोठी खेळी करू न शकल्याने तमिळनाडू थोडा निराश झाला. ओडिशाकडून बदाल बिस्वाल वगळता सर्व गोलंदाजांना विकेट्स मिळाल्या.
यश राठोडचे नाबाद शतक
गतविजेत्या विदर्भाला सुरुवातीला मोठा धक्का बसला होता आणि संघ ४५/४ असा अडचणीत होता. मात्र यश राठोड (नाबाद १०४) याने रोहित बिंकर (३७) आणि दर्शन नळकंदे (३६) यांच्यासोबत भागीदाऱ्या करत संघाला ७ बाद २६७ धावांपर्यंत नेले.आंध्रकडून के. एस. नरसिंहा राजू याने ४/५१ अशी शानदार गोलंदाजी केली.
शरणदीप सिंहचे नाबाद १२८
लखनौ येथे झारखंडने उत्तर प्रदेशविरुद्ध पहिल्या दिवसाअखेर १ बाद २७९ धावा केल्या.
शरणदीप सिंह (नाबाद १२८), शिखर मोहन (७८) आणि आर्यमन सेन (नाबाद ६८) यांनी शानदार फलंदाजी केली. शरणदीपने १५ चौकार मारले. उत्तर प्रदेशकडून फक्त विप्रज निगमला एकमेव विकेट मिळाली.
सुदीप चॅटर्जीचे नाबाद १४०
सर्व्हिसेसविरुद्ध बंगालने ४ बाद ३४० धावा करत वर्चस्व गाजवले.
सुदीप चॅटर्जीने १२ चौकार आणि १ षटकारासह नाबाद १४० धावा केल्या. अभिमन्यू ईश्वरनने ८१ धावा केल्या. दोघांमध्ये १५१ धावांची सलामी भागीदारी झाली.
आयुष दोहेजाची झुंजार खेळी
दिल्लीचा संघ एकवेळ ११९/९ असा अडचणीत होता. मात्र आयुष दोहेजा (नाबाद १०४) आणि क्रमांक ११ चा फलंदाज मनी ग्रेवाल (३५) यांनी दहाव्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी करत संघाला २१६ धावांपर्यंत नेले. छत्तीसगडने उत्तरादाखल बिनबाद ५२ अशी सुरुवात केली.
केरळ १३९ ऑलआऊट; चंदीगड आघाडीवर
निशुंक बिर्ला (४ विकेट्स) आणि रोहित धांडा (३ विकेट्स) यांच्या माऱ्यामुळे केरळ १३९ धावांत बाद झाला. उत्तरादाखल चंदीगड १ बाद १४२ अर्जुन आझादने नाबाद ७८ आणि मनन वोहरा याने नाबाद ५१ केल्या.
रणजी खेळण्याची गिलनेच केली होती शिफारस
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच शुभमन गिलने आयपीएलपूर्वी भारतीय खेळाडूंनी रणजी ट्रॉफीचा किमान एक सामना खेळावा अशी शिफारस केली होती. कसोटी क्रिकेटमधील कामगिरी सुधारण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणं महत्त्वाचं असल्याचं त्याचं मत होतं. याबाबत त्याने निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी चर्चा केली होती. मात्र स्वतःच्याच रणजी पुनरागमनात गिलला सपशेल अपयश आले आहे.
सर्फराज खान, सिद्धेश लाडची शतके
सर्फराज खान (नाबाद १४२) आणि कर्णधार सिद्धेश लाड (१०४) यांच्या शानदार खेळीमुळे मुंबईने पहिल्या दिवसअखेर ४ बाद ३३२ धावा असा मजबूत पवित्रा घेतला आहे. मुंबईने ६० धावांची सलामी दिली होती. मात्र त्यानंतर अवघ्या २२ धावांत तीन विकेट्स पडल्या. नव्या कर्णधार मोहम्मद सिराजने त्यापैकी एक विकेट घेतली. त्यानंतर सर्फराज आणि लाड यांनी चौथ्या विकेटसाठी २४९ धावांची भक्कम भागीदारी करत डाव सावरला. लाड १७९ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांसह १०४ धावा करून रोहित रायुडूकडून एलबीडब्ल्यू बाद झाला. सर्फराजने आक्रमक खेळ करत ९ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद १४२ धावा केल्या.