कोहलीचे शतक व्यर्थ : डॅरिल मिचेलला मालिकावीरासह सामनावीर पुरस्कार

इंदूर : विराट कोहलीच्या शानदार १२४ धावांच्या खेळीनंतरही आणि हर्षित राणा व नितीश रेड्डीच्या पहिल्या अर्धशतकांनंतरही भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. रविवारी झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात भारताचा ४१ धावांनी पराभव झाला आणि त्यामुळे न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र न्यूझीलंडने इंदूर येथे ८ गडी गमावून ३३७ धावांचा डोंगर उभारला. डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी चौथ्या विकेटसाठी २१९ धावांची शानदार भागीदारी करत भारताच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. डॅरिल मिचेलला सामनावीर तसेच मालिकावीर घोषित करण्यात आले.
३३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. रोहित शर्मा (११) आणि शुभमन गिल (२३) लवकर बाद झाले. पहिल्या पॉवरप्लेमध्ये भारताची धावसंख्या २ बाद ६६ अशी होती. त्यानंतर श्रेयस अय्यर (३) आणि के. एल. राहुल (१) देखील स्वस्तात बाद झाले.
मात्र विराट कोहलीने नितीश कुमार रेड्डीच्या साथीने डाव सावरला आणि अर्धशतकी भागीदारी केली. पुढे हर्षित राणासोबत सातव्या विकेटसाठी ५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करत कोहलीने आपल्या कारकिर्दीतील ८५ वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले.
हर्षित राणाने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. मात्र फॉल्क्सने सलग दोन चेंडूंवर हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज यांना बाद केले. अखेरीस विराट कोहली १२४ धावांवर बाद झाला आणि भारताचा डाव २९६ धावांत संपुष्टात आला.
न्यूझीलंडचा दमदार डाव
भारताने सुरुवातीच्या दोन षटकांत दोन फलंदाज बाद करत चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर डॅरिल मिचेलने प्रथम विल यंगसोबत ५३ धावांची आणि नंतर ग्लेन फिलिप्ससोबत १५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करत सामना पूर्णपणे न्यूझीलंडच्या बाजूने झुकवला.
ग्लेन फिलिप्स (१०६) आणि डॅरिल मिचेल (१३७) अनुक्रमे ४४व्या आणि ४५व्या षटकात बाद झाले. विशेष म्हणजे भारताविरुद्ध मिचेलची ही सर्वोच्च वनडे धावसंख्या होती. त्यानंतर न्यूझीलंडची पडझड झाली. अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
मालिकेतील ऐतिहासिक नोंदी
१९८८ नंतर आठ प्रयत्नांनंतर प्रथमच न्यूझीलंडने भारतात वनडे द्विपक्षीय मालिका जिंकली.
इंदूरमध्ये भारताचा हा पहिलाच वनडे पराभव ठरला; यापूर्वी भारताने येथे सलग ७ सामने जिंकले होते. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ८ पैकी ६ सामने जिंकले होते.
ऑक्टोबर २०२२ नंतर प्रथमच, सलग १३ सामने जिंकल्यानंतर नाणेफेक जिंकूनही भारताला मायदेशात वनडे सामन्यात पराभव पत्करावा लागला.
पराभवात सर्वाधिक शतके (वनडे)
१४ – सचिन तेंडुलकर
११ – ख्रिस गेल
९ – ब्रेंडन टेलर
९ – विराट कोहली
न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक शतके
१० – विराट कोहली (७३ डाव)
९ – जॅक कॅलिस (७६ डाव)
९ – जो रूट (७१ डाव)
९ – सचिन तेंडुलकर (८० डाव)