गोवा ६९ धावांनी आघाडीवर

पणजी : रणजी ट्रॉफी स्पर्धेतील एलिट ‘ब’ गटातील सामन्यात यजमान महाराष्ट्राने गोवा संघावर पहिल्या डावाच्या आधारे १४१ धावांची विशाल आघाडी घेतली. गहुंजे, पुणे स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. गोव्याच्या पहिल्या डावातील २०९ धावांना उत्तर देताना महाराष्ट्राने आपल्या पहिल्या डावात १०६ षटकांत ३५० धावा केल्या. तिसर्या दिवसअखेर गोव्याने आपल्या दुसर्या डावात ७३ षटकांच्या खेळात ६ बाद २१० धावा केल्या आहेत. गोवा संघाकडे ६९ धावांची आघाडी आहे. गोव्याने आपल्या दुसर्या डावात सलामीवीर सुयश प्रभुदेसाई (१३) व मंथन खुटकर (१८) यांना लवकर गमावले. स्नेहल कवठणकर (१) व ललित यादव (०) यांनी देखील निराश केले.
गोवा संघातर्फे दुसर्या डावात अभिनव तेजराणा याने १५२ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह १०९ धावांची झंझावाती खेळी केली. अनुभवी दर्शन मिसाळने खेळपट्टीवर नांगर टाकताना १५३ चेंडूंत नाबाद ५३ धावा केल्या आहेत. खाते न खोललेला अर्जुन तेंडुलकर त्याला साथ देत आहे.
तत्पूर्वी, दुसर्या दिवसाच्या ८ बाद ३०६ धावांवरून पुढे खेळताना महाराष्ट्र संघाने चांगला खेळ दाखवला. ९५ धावांवर नाबाद राहिलेल्या सौरभ नवाले याने शतक पूर्ण करताना १०५ धावा केल्या. विकी ओस्तवालने नाबाद ३८ धावा करत आपली उपयुक्तता सिद्ध केली. गोवा संघातर्फे ललित यादव सर्वांत यशस्वी ठरला. त्याने ९८ धावांत ४ गडी बाद केले. कौशिक व्ही. व अर्जुन तेंडुलकर यांनी प्रत्येकी २ तर दर्शन मिसाळ व अमूल्य पांड्रेकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : गोवा, पहिला डाव : सर्वबाद २०९ : महाराष्ट्र, पहिला डाव (८ बाद ३०६ वरून) १०६ षटकांत सर्वबाद ३५० (सौरभ नवाले १०५, विकी ओस्तवाल नाबाद ३८, हितेश वाळुंज ८, अवांतर १४, कौशिक ५८-२, अर्जुन तेंडुलकर ४९-२, दर्शन मिसाळ ६८-१, अमूल्य पांडरेकर ५७-१, ललित यादव ९८-४), गोवा दुसरा डाव - ७३ षटकांत ६ बाद २१० (सुयश प्रभुदेसाई १३, मंथन खुटकर १८, अभिनव तेजराणा १०९, स्नेहल कवठणकर १, ललित यादव ०, दर्शन मिसाळ नाबाद ५२, दीपराज गावकर ४, अर्जुन तेंडुलकर नाबाद ०, अवांतर १३, जलज सक्सेना ६४-२, रामकृष्ण घोष ३६-०, विकी ओस्तवाल ५२-१, हितेश वाळुंज ४५-३)