सरन्यायाधीश : अमलीपदार्थ विरोधी जागृती मोहिमेचा समारोप

कार्यक्रमात दीपप्रज्वलन करताना सरन्यायाधीश सूर्यकांत. सोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : अमलीपदार्थांची (ड्रग्ज) समस्या ही केवळ गुन्हेगारी स्वरूपाची नसून सामाजिक, मानसिक आणि आरोग्याची समस्या आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश न्या. सूर्य कांत यांनी केले. रविवारी राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित अमलीपदार्थ विरोधी जागृती मोहिमेच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, न्या. जे. के. महेश्वरी, न्या. मनमोहन, न्या. चंद्रशेखर, न्या. सुमन श्याम, न्या. वाल्मिकी मिनेझिस व इतर अधिकारी उपस्थित होते.
सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले की, गोवा विधी सेवा प्राधिकरणाच्या जागृती मोहिमेने अमलीपदार्थांची समस्या केवळ दंडात्मक स्वरूपाची नाही, हे सिद्ध केले आहे. अमलीपदार्थ हे कोणताही आवाज न करता आयुष्यात, समाजात शिरून त्यांना उद् ध्वस्त करतात. याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक व अन्य सर्वांनी आपली भूमिका काय असावी, हे समजून घेणे आवश्यक आहे. विधी सेवा प्राधिकरणाने सुरू केलेली अमलीपदार्थ विरोधातील जागृती मोहीम अन्य राज्यांनीही सुरू करणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, राज्य सरकार अमलीपदार्थांबाबत कसलीही तडजोड करत नाही. सरकार अमलीपदार्थांच्या विरोधात कडक धोरण राबवत आहे. अमलीपदार्थांच्या विरोधात जागृती मोहिमा, धडक कृती यापुढेही सुरूच राहणार आहे. नशामुक्त आणि सुरक्षित गोव्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
करुणेशिवाय न्याय म्हणजे जुलूम
सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले की, चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत मी न्यायदान पद्धतीमधील बदल पाहिले आहेत. मला समजले आहे की, न्याय देताना करुणा, दया असणे आवश्यक आहे. करुणेशिवायचा न्याय हा जुलूम बनू शकतो. तसेच न्यायाशिवायची करुणा गोंधळ बनते.
गोमंतकीयांच्या डीएनएमध्ये आनंदी वृत्ती
गोव्याचा आत्मा केवळ इमारतींमध्ये नसून येथील नागरिकांमध्येही आहे. येथील लोकांच्या डीएनएमध्ये आनंदी वृत्ती, सौंदर्य आहे. स्वतःचा वारसा जपणे, आपल्या वेगळ्या ओळखीचा अभिमान असणे ही गोव्याची ओळख आहे, असेही सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले.
कृत्रिम गोष्टींवर अवलंबून राहू नये
न्या. मनमोहन म्हणाले की, मागील काही वर्षांत अमलीपदार्थांची समस्या वाढली आहे. ही केवळ वैयक्तिक नसून सामूहिक, सामजिक, राजकीय समस्या आहे. गोव्याला निसर्गाची देणगी आहे. अमलीपदार्थांसारख्या कृत्रिम गोष्टींवर अवलंबून राहण्यापेक्षा गोव्यातील निसर्गाचा आनंद घ्यावा.