राष्ट्रीय हरित लवादाने आदेश केला रद्द

पणजी: आगोंद येथील बेकायदा उभारलेल्या रेस्टॉरंट व शॅक्सना बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीत गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) चुकीच्या सर्व्हे क्रमांकाचा उल्लेख केला होता. हा तांत्रिक दोष लक्षात घेऊन राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) प्राधिकरणाचा आदेश रद्द केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १७ मार्च २०२६ रोजी होणार आहे.
'अल्केमिस्ट ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड'ने दाखल केलेल्या याचिकेवर राष्ट्रीय हरित लवादाचे न्यायालयीन सदस्य दिनेश कुमार सिंग व तज्ज्ञ सदस्य डॉ. सुजितकुमार वाजपेयी यांनी हा निकाल दिला. याचिकादाराने आगोंद येथील सर्व्हे क्रमांक १०२/१ मधील जमिनीत ११ शॅक्स व १ रेस्टॉरंट उभारण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, प्राधिकरणाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीत सदर बांधकामे सर्व्हे क्रमांक १०२/१, १०२/३ आणि ११८/२३ मध्ये असल्याचे नमूद केले होते. मूळ अर्ज आणि नोटिशीतील सर्व्हे क्रमांकात तफावत असल्याने लवादाने प्राधिकरणाचा आदेश सदोष ठरवून तो रद्दबातल केला. अल्केमिस्ट ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने या विसंगतीकडे लक्ष वेधत प्राधिकरणाच्या आदेशाला आव्हान दिले होते.