हणजूणमध्ये कारची माडाला धडक; केपे येथील २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
17 mins ago
हणजूणमध्ये कारची माडाला धडक; केपे येथील २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

म्हापसा: उत्तर गोव्यातील हणजूण परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. हडफडेहून हणजूणच्या दिशेने जाणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या माडाला जोरदार धडक दिली. या भीषण स्वयंअपघातात केपे येथील जस्टर रॉड्रिग्ज (वय २७) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी २५ जानेवारी रोजी पहाटे ३:१५ च्या सुमारास रॉकी गॅरेजजवळ हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, जस्टर हा त्याच्या 'किया सेल्टोस' (GA 03 Y 9663) कारने हणजूणच्या दिशेने जात होता. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता, मात्र रॉकी गॅरेजजवळ पोहोचताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली ही कार वेगाने रस्त्याच्या कडेला असलेल्या माडावर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या समोरील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघाताच्या आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाले आणि त्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.

अपघातात जस्टरला गंभीर दुखापत झाली होती. जखमी अवस्थेतील या तरुणाला स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलीस हवालदार विशाल गावस यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अपघातग्रस्त कार पोलीस ठाण्यात नेण्यात आली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला, गाडीचा वेग किती होता किंवा तांत्रिक बिघाड होता का, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक लीशा खर्बे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





 

हेही वाचा