वाडे कुर्डी, सांगे येथे आयोजन : मंत्री तवडकर, फळदेसाई यांची उपस्थिती

आदिवासी महोत्सवाचे उद्घाटन करताना कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार केदार नाईक व इतर. (संदीप मापारी)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
सांगे : महोत्सवांतून ग्रामविकासाची नांदी सुरू होते. कलाकारांना व्यासपीठ मिळते. आदिवासी लोकांनी आपली संस्कृती आणि परंपरा जोपासली पाहिजे. माणसाचे कर्म महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांनी केले. वाडे कुर्डी येथील तीन दिवसीय आदिवासी महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.
सांगे आदिवासी क्रीडा आणि सांस्कृतिक कलबतर्फे कला आणि संस्कृती संचालनालय, आदिवासी कल्याण खाते, माहिती आणि प्रसिद्धी खाते यांच्या सहकार्याने, तसेच श्री चौरासमाया युवा क्रीडा आणि सांस्कृतिक क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सांगेतील वाडे कुर्डी येथील सरकारी हायस्कूलच्या मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री रमेश तवडकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेव मेंग गावकर, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार केदार नाईक, अध्यक्ष सुहास देईकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार केदार नाईक यांनीही विचार मांडले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर एसटी विकास महामंडळाचे अध्यक्ष वासू गावकर, जिल्हा पंचायत सदस्य राजश्री गावकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, नगराध्यक्ष संतीक्षा गडकर, हस्तकला आणि काथेकाम खाते संचालक सगुण वेळीप, उप जिल्हाधिकारी मिलिंद्र वेळीप, मामलेदार सिद्धार्थ प्रभू, संयुक्त मामलेदार विराज मलकर्णी, सरपंच चंद्रकांत गावकर, क्लबचे अध्यक्ष सुहास देईकर आदी उपस्थित होते. सुहास देईकर यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. सूत्रसंचालन प्रशांत येवडकर यांनी केेले. आभार चंद्रकांत गावकर यांनी मानले.
महोत्सव आयोजनासाठी मिळणार आता १० लाख रुपये
मंत्री तवडकर म्हणाले की, लोकोत्सव, महोत्सव आयोजित करण्यासाठी कला आणि संस्कृती खात्यातर्फे ५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. यात वाढ करून १० लाख रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. आदिवासी कल्याण खात्याअंतर्गत साहाय्यता योजनेत दुरुस्ती करून ५ लाखांवरून १० लाख रुपये देण्यात येणार आहेत. युवा व्यवहार खात्यामार्फत क्रीडा क्लबना ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मिळावे, अशी योजना केली जाणार आहे. शिगमो मेळांना प्रोत्साहन देण्यासाठी ढोल, ताशे, टाळ, मृदंग, कपडे घेण्यासाठी दोन लाख रुपये देण्याची योजना तयार करण्यात येत आहे.