परदेशातून झालेला पैशांचा व्यवहार देखील संशयास्पद

पणजी: गोव्यातील हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' या नाईट क्लबला ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा बळी गेला होता. गेल्या ४९ दिवसांत अनेक घडामोडी घडल्या. आता ईडीने या प्रकरणातील बेकायदा आर्थिक व्यवहारांची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली आहे. मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत (PMLA) कारवाई करत ईडीने शुक्रवारी गोवा, दिल्ली आणि गुरुग्राममधील नऊ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. या धाडसत्रात क्लबचे मालक सौरभ लुथरा, माजी सरपंच रोशन रेडकर आणि तत्कालीन सचिव रघूवीर बागकर यांच्या निवासस्थानांची झाडाझडती घेण्यात आली असून, अनेक प्रकारांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलीस तपासात या क्लबने बनावट आरोग्य दाखले (NOC) आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे परवाने मिळवल्याचे उघड झाले होते. मात्र, ईडीच्या तपासात या गुन्ह्याची व्याप्ती अधिकच मोठी असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक चौकशीनुसार, या क्लबने आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ दरम्यान सुमारे २२ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला होता. हा सर्व पैसा 'गुन्ह्यातून मिळालेली कमाई' (Proceeds of Crime) असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे, कारण हा क्लब कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय आणि बनावट संमतीपत्रांच्या आधारे चालवला जात होता.
ईडीने केलेल्या तपासात परदेशातून आलेल्या संशयास्पद पैशांचे व्यवहारही (Foreign Remittances) उघड झाले आहेत. क्लबच्या बेकायदेशीर व्यवसायातून मिळालेला कोट्यवधी रुपयांचा नफा वैयक्तिक बँक खात्यांमध्ये आणि इतर शेल कंपन्यांमध्ये वळवण्यात आला होता. या छाप्यादरम्यान ईडीने मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. तसेच, ज्या बँक खात्यांमध्ये हा काळा पैसा लपवण्यात आला होता, ती सर्व खाती तातडीने गोठवण्यात आली आहेत.
६ डिसेंबर रोजी लागलेल्या त्या भीषण आगीने संपूर्ण गोव्याला हादरवले होते, मात्र या दुर्घटनेच्या मागे भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक गैरव्यवहाराचे एक मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे आता स्पष्ट होत आहे. ज्या खाजन जमिनीवर हा क्लब उभारला गेला, त्या जमिनीचे बेकायदा रूपांतर करण्यामागे मोठे हितसंबंध गुंतलेले आहेत. या प्रकरणातील भ्रष्टाचाराचा कोन तपासण्यासाठी ईडीने आपला मोर्चा आता राजकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वळवला आहे. या प्रकरणी तत्कालीन सचिव रघुवीर बागकर आणि सरपंच रोशन रेडकर यांना आधीच अटक केली असून, ईडीच्या या नव्या कारवाईमुळे आता अनेक बड्या धेंडांचे धाबे दणाणले आहेत.