गोव्याला आरोग्य, स्वास्थ्याचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी प्रयत्नशील

योगगुरु बाबा रामदेव : आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक आणि वेलनेस संमेलनात सहभाग


4 hours ago
गोव्याला आरोग्य, स्वास्थ्याचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी प्रयत्नशील

पत्रकारांशी संवाद साधताना बाबा रामदेव.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्यात पतंजली योग पीठाचे नवीन केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत राज्य सरकारसोबत बोलणी सुरू आहेत. लवकरच आम्ही गोव्याला आरोग्य, स्वास्थ्याचे जागतिक केंद्र बनवणार आहोत. आमची संस्था गोव्याच्या मूळ सनातन संस्कृतीला सोबत घेऊनच समृद्धीकडे जाणार आहे, असे प्रतिपादन योगगुरु बाबा रामदेव यांनी केले. शनिवारी आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक आणि वेलनेस संमेलनाच्या अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी योगसेतू येथे योगासनांची प्रात्यक्षिके घेतली.
बाबा रामदेव पुढे म्हणाले की, गोवा म्हटल्यावर लोकांच्या डोळ्यांसमोर सुंदर समुद्र किनारे, निसर्ग, नद्या येतात. मात्र त्याचवेळी कॅसिनो, दारू, नृत्य अशा गोष्टीही येतात. या गोष्टी गोव्याची मूळ संस्कृती नाही. गोव्याची प्रतिमा सुंदर निसर्ग आणि जागतिक आरोग्य केंद्र अशी झाली पाहिजे. जगभरातील लोक येथे आपल्या आरोग्यासाठी आले पाहिजेत. बदलत्या जीवनशैलीमुळे आजार, ताण-तणाव वाढत आहेत. लोक आपले स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशावेळी गोव्यात आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्र उभारल्यास त्याचा फायदा राज्याला होईल.
ते म्हणाले, पतंजली आरोग्य केंद्राकडे आयुर्वेद व अन्य भारतीय उपचार पद्धतीबाबतचे शास्त्रीय पुरावे आहेत. प्रत्यक्ष, टीव्ही व अन्य माध्यमातून आम्ही १०० कोटीहून अधिक लोकांपर्यंत पोहोचलो आहोत. आम्हाला खात्री आहे की, लोकांना येथे संपूर्ण स्वास्थ्याचा अनुभव घेता येईल. सध्या गोव्यात केंद्र सुरू करण्याबाबत आमचे सदस्य आराखडा तयार करत आहेत. स्वस्थ, भयमुक्त राष्ट्रासाठी मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. यासाठी पतंजली सर्व ती मदत करण्यास तयार आहे.
केवळ घोषणा नको
बाबा रामदेव म्हणाले की, लोकांनी केवळ सनातन धर्मातील तत्त्वाच्या केवळ घोषणा देऊ नयेत. सनातन धर्म, संस्कृती, योग, आयुर्वेद यांना आपल्या जीवनाचा एक बनवला पाहिजे. असे केले तरच आपण आजार आणि वाईटपणा यांच्यापासून मुक्त होऊ शकतो.

हेही वाचा