
पणजी: अमली पदार्थांची समस्या ही केवळ गुन्हेगारी स्वरूपाची नसून ती एक गंभीर सामाजिक, मानसिक आणि आरोग्याची समस्या आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केले. रविवारी राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित 'अमली पदार्थ विरोधी जागृती मोहिमेच्या' समारोप सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी, न्यायमूर्ती मनमोहन, न्यायमूर्ती चंद्रशेखर, न्यायमूर्ती सुमन श्याम, न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेझिस व अन्य मान्यवर उपस्थित होते.
न्यायमूर्ती सूर्यकांत पुढे म्हणाले की, गोवा विधी सेवा प्राधिकरणाच्या या मोहिमेने हे सिद्ध केले आहे की, अमली पदार्थांची समस्या केवळ दंडात्मक कारवाईने सुटणारी नाही. अमली पदार्थ अत्यंत शांतपणे मानवी आयुष्यात आणि समाजात शिरकाव करून त्यांचा विनाश करतात. याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजातील सर्व घटकांनी आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे. गोव्याने सुरू केलेली ही मोहीम अन्य राज्यांनीही राबवणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, राज्य सरकार अमली पदार्थांच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही. सरकार याविरोधात अत्यंत कडक धोरण राबवत असून, जागृती मोहिमा आणि धडक कारवाया यापुढेही सुरूच राहतील. नशामुक्त आणि सुरक्षित गोव्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.
करुणेविना न्याय म्हणजे जुलूम
आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीचा अनुभव सांगताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, न्यायदान पद्धतीमधील अनेक बदल मी जवळून पाहिले आहेत. न्याय देताना मनात करुणा आणि दया असणे अनिवार्य आहे. करुणेविना दिलेला न्याय हा जुलूम ठरू शकतो, तर न्यायाविना दाखवलेली करुणा गोंधळ निर्माण करू शकते.
गोमंतकीयांच्या 'डीएनएमध्ये' आनंदी वृत्ती
गोव्याचा आत्मा केवळ येथील वास्तू किंवा इमारतींमध्ये नसून तो येथील नागरिकांमध्ये वसलेला आहे. गोमंतकीयांच्या 'डीएनएमध्ये' (DNA) उपजत आनंदी वृत्ती आणि सौंदर्य आहे. आपला सांस्कृतिक वारसा जपणे आणि स्वतःच्या वेगळ्या ओळखीचा अभिमान बाळगणे हीच गोव्याची खरी ओळख आहे, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी गोव्याचे कौतुक केले.