डिचोलीत भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; लाखेरेतील तरुण जागीच ठार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
डिचोलीत भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; लाखेरेतील तरुण जागीच ठार

डिचोली: डिचोली तालुक्यातील लाखेरे येथे रविवारी (२५ जानेवारी) एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. एका भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका स्थानिक तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. अपघात घडताच कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण आपल्या दुचाकीवरून लाखेरे-डिचोली मार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या एका कंटेनरने त्याला भीषण धडक दिली. धडकेमुळे तरुण दुचाकीसह अनेक फूट लांब फेकला गेला. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र गंभीर दुखापत झाल्यामुळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.

अपघातानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून चालक कंटेनर सोडून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच डिचोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पोलिसांनी अपघातग्रस्त कंटेनर जप्त केला असून फरार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांची विविध पथके आरोपी चालकाचा शोध घेत आहेत.


डिचोली आणि परिसरातील अरुंद रस्त्यांवरून धावणाऱ्या अवजड वाहनांच्या अतिवेगामुळे निष्पापांचे बळी जाण्याचे सत्र थांबायला तयार नाही. या अपघातानंतर लाखेरे परिसरात संतापाची लाट असून, दोषी चालकाला कठोर शिक्षा व्हावी आणि अवजड वाहनांच्या वेगावर मर्यादा घालाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा