हिंदु जनजागृती समितीची प्रशासन, पोलिसांकडे मागणी

म्हार्दाेळचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत कांदोळकर यांना निवेदन देताना प्रियोळ जिल्हा पंचायतीच्या सदस्या अदिती गावडे. सोबत संजिता नाईक, भक्ती सतरकर आणि साईराज सतरकर.
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
पणजी : राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता. प्रजासत्ताकदिनी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज त्या दिवशीच रस्त्यावर, कचरापेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत. त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पहावी लागते. या पार्श्वभूमीवर राज्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन वा विक्री होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने पणजी, फोंडा, बार्देश, पेडणे, डिचोली, काणकोण या ठिकाणी प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी यांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. म्हार्दाेळचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत कांदोळकर यांनाही हे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रियोळ जिल्हा पंचायतीच्या सदस्य अदिती गावडे, हिंदु जनजागृती समितीच्या संजिता नाईक, भक्ती सतरकर आणि साईराज सतरकर उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने राज्यभरातील माध्यमिक, तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांच्या व्यवस्थापनाच्या भेटी घेऊन त्यांच्यामध्ये प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती राबवत असलेल्या ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ उपक्रमाविषयी जागृती केली.