साखळी रवींद्र भवन भक्तीगीत गायनात करणार विश्वविक्रम

सलग ३० तासांचे सादरीकरण : रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये होणार नोंद


6 hours ago
साखळी रवींद्र भवन भक्तीगीत गायनात करणार विश्वविक्रम

पत्रकार परिषदेत नादब्रह्म सोहळ्याविषयी माहिती देताना साखळी रवींद्र भवनच्या संचालिका स्नेहा देसाई. सोबत दिनकर घाडी, अमोल बेतकीकर, रविराज च्यारी व श्रीनेश हिंदे.
वार्ताहर। गोवन वार्ता
साखळी : साखळी रवींद्र भवन व पद्मिनी फाऊंडेशन, साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नादब्रह्म’ हा सलग ३० तास भक्तीगीत गायनाचा भव्य कार्यक्रम सादर करून विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात येणार आहे. प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारी रोजी सकाळी ११ ते २७ रोजी सायं. ५ पर्यंत सलग ३० तास भक्तीगीत गायन वेगवेगळ्या गायकांकडून गायिले जाणार आहे. यापूर्वी असा २४ तासांचा विक्रम भारतातच करण्यात आला आहे, अशी माहिती रवींद्र भवनच्या संचालिका स्नेहा देसाई व संचालक दिनकर घाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साखळी रवींद्र भवनचे नवीन संचालक मंडळाने ताबा स्वीकारल्यानंतर सुमारे दीड वर्षात वेगवेगळे कार्यक्रम व अभिनव उपक्रम राबविले आहेत. या कार्यक्रमांना रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. याच प्रेरणेने रवींद्र भवन साखळीचे नाव जागतिक पातळीवर नेण्यासाठी ३० तासांचा सलग भक्तीगीत गायनाचा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याची संकल्पना सत्यात उतरविण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी रवींद्र भवनमधील पं. मनोहरबुवा शिरगावकर सभागृह व खुले सभागृह वापरले जाणार आहे. एका ठिकाणी मैफल संपताच दुसऱ्या व्यासपीठावर मैफल सुरू होईल.
या उपक्रमात ७८ पुरुष गायक, ८३ महिला गायक, २४ हार्मोनियम वादक, २१ तबलापटू, ५ पखवाजवादक व एक मंजिरीवादक असे २०१ कलाकार सहभागी होणार आहेत. सुमारे ४५० भक्तीगीते सादर केली जाणार आहेत. एकच गीत पुन्हा गायले जाऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. या उपक्रमाची नोंद घेण्यासाठी वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाचे पदाधिकारी रवींद्र भवन साखळी येथे उपस्थित राहतील, असेही स्नेहा देसाई व दिनकर घाडी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला संचालक अमोल बेतकीकर, रविराज च्यारी, कार्यक्रम समन्वयक श्रीनेश हिंदे उपस्थित होते.      

हेही वाचा