चोर्ला घाटातून ४०० कोटी गेले कुठे?

नाशिक पोलिसांच्या पत्रानंतर बेळगाव पोलीस काय म्हणाले ? वाचा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
चोर्ला घाटातून ४०० कोटी गेले कुठे?

बेळगाव : कर्नाटक राज्यातील चोर्ला घाटात ४०० कोटी रुपयांच्या जुन्या चलनी नोटांनी भरलेले दोन कंटेनर लुटल्याच्या संशयावरून नाशिकमध्ये एका तरुणाचे अपहरण आणि १०० कोटींच्या खंडणी वसुलीचा थरार समोर आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी आता 'विशेष तपास पथका'ची (एसआयटी) स्थापना केली असून, या लुटीमागे राजकीय क्षेत्रातील एका बड्या ‘साहेबा’चा हात असल्याची चर्चा रंगल्याने संपूर्ण महसूल आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांनी बेळगाव पोलिसांशी पत्रव्यवहार करून याप्रकरणी सविस्तर चौकशीची मागणी केली होती. नाशिक पोलिसांच्या पत्रानंतर बेळगाव पोलिसांनी काय उत्तर दिले ? वाचा सविस्तर. 




 






अपहरण आणि १०० कोटींची मागणी

 या प्रकरणातील तक्रारदार संदीप दत्ता पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी गोव्याहून कर्नाटकाच्या दिशेने जाणारे दोन कंटेनर चोर्ला घाटात कथितरित्या लुटण्यात आले होते. या कंटेनरमध्ये बंदी घातलेल्या २ हजार रुपयांच्या तब्बल ४०० कोटींच्या जुन्या नोटा होत्या. या लुटीत संदीप पाटील यांचा हात असल्याचा संशय संशयितांना होता. याच संशयावरून २२ ऑक्टोबर रोजी विशाल नायडू आणि त्याच्या साथीदारांनी पाटील यांना इगतपुरीतील घोटी येथे बोलावून घेतले आणि पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली आणि अन्य एक संशयित विराट गांधी याने व्हिडिओ कॉलवरून 'आमचे ४०० कोटी परत कर, नाहीतर तुला खतम करू' अशी धमकी देत १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली.

पाच संशयितांना अटक; मुख्य सूत्रधार अद्यापही फरार

 नाशिक ग्रामीण पोलिसांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पोलिसांनी आतापर्यंत संशयित विराट गांधीसह पाच जणांना अटक केली असून, मुख्य संशयित किशोर सावला आणि अझहर हे अद्याप फरार आहेत. ही प्रचंड मोठी रोकड ठाण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक किशोर सावला यांच्याशी संबंधित असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत ९ जानेवारी रोजी हा गुन्हा दाखल झाला होता. यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे.

नाशिक पोलिसांचा कर्नाटक पोलिसांकडे पत्रव्यवहार; सखोल चौकशीची मागणी

 नाशिकमधील संदीप दत्ता पाटील या तरुणाचे अपहरण करून त्यांच्याकडे १०० कोटींची खंडणी मागितल्याच्या तक्रारीनंतर, नाशिक पोलिसांनी बेळगाव पोलिसांकडे या प्रकरणाच्या तपासासाठी पत्रव्यवहार केला होता. या पत्राला उत्तर देताना बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, सध्या ही माहिती केवळ 'ऐकीव' स्वरूपाची असून चोर्ला घाट परिसरात ४०० कोटींच्या कंटेनर लुटीची कोणतीही अधिकृत नोंद नाही. त्यांनी अशा कोणत्याही लुटीचा दावा फेटाळून लावला आहे.






बेळगाव पोलिसांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिक पोलिसांनी पाठवलेल्या प्राथमिक माहितीमध्ये गुन्ह्याची व्याप्ती मोठी असली, तरी त्यात ठोस पुराव्यांचा अभाव आहे. या प्रकरणाचा गुन्हा नोंदवण्यासाठी आणि परिणामकारक तपास करण्यासाठी पीडित व्यक्तीची नेमकी ओळख, आरोपींचे सविस्तर वर्णन, लुटण्यात आलेल्या कंटेनरचा तपशील आणि इतर तांत्रिक पुरावे बेळगाव पोलिसांनी नाशिक पोलिसांकडे मागितले आहेत. ठोस पुराव्याशिवाय हा तपास पुढे नेणे कठीण असल्याचे बेळगाव पोलिसांनी नमूद केले आहे.

खानापूर पोलिसांकडून चौकशी सुरू

 या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन बेळगाव पोलिसांनी खानापूर पोलीस ठाण्यातील एका उपनिरीक्षकाची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्याने नाशिक पोलीस कार्यालयाशी संपर्क साधून माहितीची देवाणघेवाण सुरू केली आहे. तक्रारदार संदीप पाटील यांनी बेळगाव पोलिसांच्या संपर्कात राहून आपला औपचारिक जबाब नोंदवावा, जेणेकरून अधिकृत एफआयआर दाखल करून पुढील कारवाई करता येईल, असेही पोलिसांनी सुचवले आहे.

 या गुंतागुंतीच्या प्रकरणामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. २ हजार रुपयांच्या चलनी नोटांचा इतका मोठा साठा नक्की कोणाचा होता आणि तो कोठे नेला जात होता, तसेच एवढ्या मोठ्या रकमेची वाहतूक होत असताना गुप्तचर यंत्रणांना याची कुणकुण कशी लागली नाही, हे अद्याप एक रहस्यच आहे. बेळगाव पोलिसांनी नाशिक पोलिसांकडे या कथित लुटीचे ठोस पुरावे आणि तांत्रिक तपशील मागितले आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत हे केवळ खंडणीचे प्रकरण आहे की खरोखरच ४०० कोटींची मोठी लूट झाली आहे, याचे गूढ कायम राहणार आहे.

हेही वाचा