पायऱ्यांवरुन पडून जखमी झाल्याचा केला बनाव; मुलाने फोडले बापाचे बिंग! हरियाणातील घटना.

फरीदाबाद: मुलांकडून अवास्तव अपेक्षा आणि पालकांच्या वाढत्या मानसिक तणावाचा एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार हरियाणातील फरीदाबादमध्ये समोर आला आहे. केवळ १ ते ५० पर्यंतचे अंक लिहिता आले नाहीत या कारणावरून संतापलेल्या एका पित्याने आपल्या चार वर्षांच्या मुलीला इतकी अमानुष मारहाण केली की, त्यात या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या क्रूर कृत्यानंतर आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली असून, या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मूळचा उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील असलेला कृष्णा जयस्वाल (३१) आपल्या कुटुंबासह फरीदाबादमधील एका भाड्याच्या घरात राहत होता. कृष्णा आणि त्याची पत्नी रंजिता हे दोघेही खासगी कंपनीत नोकरी करतात. पत्नी दिवसा कामावर जात असल्याने रात्रपाळी करून घरी आलेला कृष्णा दिवसा मुलांचा अभ्यास घेण्याचे काम करायचा. २१ जानेवारी रोजी कृष्णाने आपल्या चार वर्षांच्या मुलीला १ ते ५० पर्यंतचे अंक लिहिण्यास सांगितले. मात्र, चिमुरडीला ते लिहिता न आल्याने पित्याचा संयम सुटला. रागाच्या भरात त्याने तिला लाटण्याने बेदम मारहाण केली आणि त्यानंतर निर्दयीपणे भिंतीवर आदळले. या जीवघेण्या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यावर आरोपी वडिलांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले आणि ती पायऱ्यांवरून पडल्याचा बनाव रचला. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. कृष्णाने आपली पत्नी रंजिता हिचीदेखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु घटनेच्या वेळी घरात असलेल्या त्यांच्या सात वर्षांच्या मुलाने आपल्या आईला सर्व सत्य सांगितले. वडिलांनी बहिणीला कशा प्रकारे मारहाण केली, याचा थरार मुलाने सांगितल्यानंतर आईने तात्काळ पोलिसांत धाव घेतली.
मुलीच्या शरीरावर मारहाणीच्या स्पष्ट खुणा आढळल्याने पोलिसांनी संशयावरून कृष्णा जयस्वालला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. फरीदाबादच्या सेक्टर ५८ मधील पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात मुलांवर शिक्षणाचा असा जीवघेणा दबाव टाकणाऱ्या या पालकाच्या कृत्यामुळे समाजमनात तीव्र संताप व्यक्त होत आहे.