
नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर देशात खळबळ उडवणारे एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. गोवा (Goa) राज्यातून कर्नाटकातील (Karnataka) एका देवस्थानासाठी नेण्यात येत असल्याचा बनाव रचून, जुन्या दोन हजार रुपयांच्या नोटांनी भरलेला सुमारे ४०० कोटी रुपयांचा कंटेनर लंपास झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या संशयातून नाशिकमधील एका तरुणाचे अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील रहिवासी संदीप पाटील यांनी नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात (Police Station) दिलेल्या तक्रारीनुसार, कर्नाटकातील चोर्ला घाट परिसरात हा कंटेनर चोरीला गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. या आरोपाच्या आधारे त्यांचे अपहरण करून अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. तेथे त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली, तसेच स्वतःसह कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गोव्याशी संबंध, प्रकरणाला वेगळे वळण
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आणि धक्कादायक भाग म्हणजे, ही कथित रोकड गोवा राज्यातून रवाना झाल्याचा दावा करण्यात आला आहे. गोव्यातून कर्नाटकात देवस्थानासाठी पैसे नेले जात असल्याचा देखावा उभा करून, प्रत्यक्षात ही रक्कम परस्पर लंपास केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता, गोवा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांपर्यंत पोहोचले आहे.
तक्रारीत संदीप पाटील यांनी या प्रकरणात काही व्यावसायिकांसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. तसेच ही संपूर्ण रक्कम मुंबई–ठाणे परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाची असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
पाच जणांना अटक, एसआयटीची स्थापना
या प्रकरणाचा तपास करताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी आणि जनार्दन धायगुडे (मुंबई) या पाच जणांना अटक केली आहे. यापैकी विराट गांधी याला नुकतीच अटक करण्यात आली असून, अद्याप दोन आरोपी फरार आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता निष्पक्ष आणि सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी दिली.
ही घटना सुमारे दीड ते दोन महिन्यांपूर्वी घडल्याचे सांगण्यात येत असून, तपास जसजसा पुढे जात आहे तसतसे राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या मोठे धागेदोरे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कथित रोकड प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडण्याची चिन्हे दिसत आहेत.