अडीच किलो आरडीएक्स, दोन पिस्तुले, जीवंत काडतुसे जप्त

अमृतसर : भारताचा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू असताना पंजाब (Punjab ) पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळून लावला आहे. अमृतसर आणि होशियापूरमध्ये विशेष मोहीम राबवून 'बब्बर खालसा इंटरनॅशनल' या दहशतवादी (Terrorist ) संघटनेच्या ५ दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांकडून अडीच किलो आरडीएक्स, पिस्तूल, जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पंजाब पोलिसांनी (Punjab Police) राबवलेल्या खास मोहिमेत बब्बर खालसा इंटरनॅशनल या संघटनेच्या दोन वेगवेगळ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. ५ दहशतवाद्यांना जेरबंद केल्यानंतर या कारवाईमुळे मोठा धोका टळल्याचा पोलिसांचा दावा आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे हरमन सिंह उर्फ हॅरी, दिलजोत सिंह, अजय उर्फ माहिरा व अर्शदीप सिंह उर्फ अर्श कंडोला अशी आहेत. यासंदर्भात माहिती देताना पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले सर्वजण एबीएस नगर जिल्ह्यातील राहों भागातील रहिवासी आहेत.
बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या चार हॅंडलरना पोलिसांनी होशियारपूरमध्ये अटक केली. अटक करण्यात आलेले सर्वजण अमेरिकेतील हॅंडलर्सच्या माध्यमातून आयएसआय समर्थीत दहशतवादी नेटवर्कशी जोडलेले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे २.५ किलो वजनाचे आरडीएक्स आधारित आयईडी स्फोटके, दोन पिस्तुले, काडतुसे जप्त केली आहेत. दुसऱ्या एका कारवाईत अमृतसर पोलिसांनी एका दहशतवाद्याला अटक केली. अटक करण्यात आलेला दहशतवादी एका सुरक्षा आस्थापनावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्याच्याकडून पोलिसांनी एक हॅंड ग्रेनेड, अत्याधुनिक पिस्तूल व काडतुसे जप्त केली आहेत. हे मॉड्यूल सीमापार बसलेल्या हॅंडलर्सच्या संपर्कात होते व पंजाबमध्ये शांतता भंग करण्यासाठी मोठ्या स्फोटांच्या तयारीत होते; असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.