आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश; गोव्यातून गुजरात आणि तेथून राजस्थानला होणार होता पुरवठा.

कोल्हापूर: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू तस्करांविरुद्ध मोठी मोहीम उघडली असून, कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने राजापूर-मलकापूर रोडवर एक मोठी कारवाई केली आहे.
अणुस्कुरा फाट्याजवळ एका सहाचाकी ट्रकमधून होणारी गोवा बनावटीच्या विदेशी दारूची तस्करी रोखण्यात आली असून, यामध्ये तब्बल १ कोटी १५ लाख २० हजार रुपये किमतीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईत राजस्थान येथील ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून, आंतरराज्य स्तरावर चालणाऱ्या एका मोठ्या तस्करी रॅकेटचा छडा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गोव्यातून एक संशयास्पद ट्रक कोल्हापूरमार्गे गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने जाणार होता. त्यानुसार जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अणुस्कुरा फाट्याजवळ सापळा रचला.
संशयास्पद हालचाली दिसताच एका सहाचाकी ट्रकला थांबवून त्याची झडती घेतली असता, ट्रकमध्ये गोव्यात निर्मिती झालेल्या आणि महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या बनावट दारूचा साठा आढळून आला. यामध्ये १८० मिलीच्या ७६ हजार ८०० बाटल्या असलेले एकूण १ हजार ६०० बॉक्स सापडले आहेत. विशेष म्हणजे, या बाटल्यांच्या लेबलवर बॅच नंबर किंवा उत्पादकाची कोणतीही माहिती नसल्याने ही दारू बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी ट्रक चालक रामजीवन विरधाराम बिष्णोई याला बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्याच्याकडून ट्रक आणि मोबाईलसह एकूण १ कोटी ३० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही आठवड्यातील दुसरी मोठी कारवाई असून, यापूर्वी देवगड-निपाणी मार्गावर ४० लाखांची बनावट दारू पकडण्यात आली होती. निवडणुकांच्या काळात अवैध दारूचा वापर वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तपासणी नाक्यांवर कडक पाळत ठेवली आहे. कोल्हापूर विभागाच्या या धाडसी कारवाईमुळे बनावट मद्य तस्करांचे धाबे दणाणले आहेत.