अदानीमागे चौकशीचा ससेमीरा; लाचखोरीप्रकरणी समन्स बजावण्यासाठी 'एसईसी'ची न्यायालयाकडे धाव

परिणामस्वरूप शुक्रवारी अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांमध्ये १३ टक्क्यांपर्यंत मोठी घसरण पहायला मिळाली.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
अदानीमागे चौकशीचा ससेमीरा; लाचखोरीप्रकरणी समन्स बजावण्यासाठी 'एसईसी'ची न्यायालयाकडे धाव

मुंबई: अमेरिकेची बाजार नियंत्रक संस्था असलेल्या 'सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन'ने (एसईसी) कथित फसवणूक आणि २६५ दशलक्ष डॉलरच्या लाचखोरी प्रकरणात उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्याविरोधात कायदेशीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही व्यक्तींना समन्स बजावण्यासाठी 'एसईसी'ने आता अमेरिकेतील न्यायालयाची विशेष परवानगी मागितली आहे. या खळबळजनक घडामोडींचे तीव्र पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले असून, शुक्रवारी अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांमध्ये १३ टक्क्यांपर्यंत मोठी घसरण झाली आहे.

हे संपूर्ण प्रकरण प्रामुख्याने अमेरिकी गुंतवणूकदारांकडून निधी उभारणाऱ्या 'अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड' या कंपनीशी संबंधित आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये 'एसईसी'ने दाखल केलेल्या आरोपपत्रात गौतम अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर लाचखोरी आणि फसवणुकीचे गंभीर ठपके ठेवले आहेत. अमेरिकेतून निधी उभारताना या दोघांनी खोटे आणि दिशाभूल करणारे दावे केले, जे अमेरिकेच्या नियामक कायद्यांचे उल्लंघन असल्याचे 'एसईसी'चे म्हणणे आहे. भारताच्या सौर ऊर्जा महामंडळाकडून (एसईसीआय) मोठी कंत्राटे मिळवण्यासाठी लाच दिल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. मात्र, अदानी समूहाने हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असून ते निराधार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वी भारत सरकारमार्फत समन्स बजावण्याचे दोन प्रयत्न अपयशी ठरले आहेत. याबाबत अमेरिकन नियामक मंडळाने न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथील न्यायालयाला कळवले आहे. भारतीय अधिकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने आता अदानी यांना थेट ईमेलद्वारे अधिकृत नोटिसा बजावण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती 'एसईसी'ने न्यायालयाकडे केली आहे. या न्यायालयीन पेचामुळे अदानी समूहाच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

या कायदेशीर घडामोडींचा परिणाम म्हणून शुक्रवारी शेअर बाजारात अदानी समूहाच्या समभागांची मोठी पडझड झाली. 'अदानी एंटरप्रायझेस' या प्रमुख कंपनीला याचा सर्वाधिक फटका बसला असून, तिचा शेअर १०.६५ टक्क्यांनी घसरून १,८६४.२० रुपयांवर बंद झाला. केवळ नियामक अडचणीच नव्हे, तर कंपनीच्या कमकुवत तिमाही निकालांमुळेही गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या या तपासामुळे अदानी समूहाच्या विश्वासार्हतेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा