कानपूरमध्ये खळबळ; देशव्यापी नेटवर्कचा संशय; मोजदाद करताना मशीन तापले, पोलिसांचे हातही दुखले, चांदी गोळा करताना कर्मचारी थकले

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये पोलिसांनी (Police) केलेल्या एका मध्यरात्रीच्या धाडीने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. कलेक्टरगंज परिसरातील धनकुट्टी भागात असलेल्या एका घरातून तब्बल २ कोटी रुपयांची रोकड आणि ६२ किलो चांदी जप्त करण्यात आली. रक्कम आंतरराष्ट्रीय (International) सट्टेबाजी आणि हवाला व्यवहाराशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
इतकी मोठी रक्कम होती की नोटा मोजताना मशीन तापले, तर मोजदाद करताना पोलिसांचे हातही दुखू लागले. चांदी गोळा करताना कर्मचारी अक्षरशः थकले. विशेष कार्यबल (SOG) आणि स्थानिक पोलिसांनी गुरुवारी रात्री सुमारे ९ वाजता रामाकांत गुप्ता यांच्या घरावर धाड टाकली. घराला चारही बाजूंनी वेढा घालून पोलिसांनी आत प्रवेश केला असता मोठ्या प्रमाणावर रोकड आणि चांदीचा साठा आढळून आला. संशयितांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले.
कार्टनमध्ये भरलेली रोकड, ५०० रुपयांच्या नोटांचा भरणा
पोलिसांनी कार्टनमध्ये भरलेली रोकड बाहेर काढली. यामध्ये प्रामुख्याने ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल होते. केवळ ५०० रुपयांच्या नोटाच सुमारे १.८० कोटी रुपयांच्या असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. उर्वरित रक्कम २०० आणि १०० रुपयांच्या नोटांमध्ये होती. नोटा मोजण्यासाठी मशीन मागवावे लागले आणि ही प्रक्रिया जवळपास चार तास चालली. चांदीचे वजन करण्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली.
पाच आरोपी अटकेत; देशव्यापी नेटवर्कचा संशय
या प्रकरणात पोलिसांनी राहुल जैन (किदवई नगर), शिवम त्रिपाठी, सचिन गुप्ता (यशोदा नगर-गंगागंज), वंशराज आणि आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार हे पाचही आरोपी मित्र असून एकत्रितपणे बेकायदेशीर व्यवहार चालवत होते. तपासादरम्यान दिल्ली, अलीगढ, वाराणसी, इंदूर, मुंबई, नोएडा आणि जयपूर येथील काही व्यक्तींची नावे समोर आली असून, या हवाला व सट्टेबाजी नेटवर्कचे धागेदोरे देशभर पसरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या धाडीची माहिती मिळताच पोलिस आयुक्त रघुबीर लाल स्वतः घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाची पाहणी केली. सध्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून, आणखी मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.