
नरसिंगडी (बांगलादेश) : बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचारांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, आता नरसिंगडी येथून एक अत्यंत क्रूर आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. चंचल भौमिक नावाच्या एका २३ वर्षीय हिंदू तरुणाला तो दुकानात झोपलेला असताना हल्लेखोरांनी जिवंत जाळले. शुक्रवारी २३ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास ही भीषण घटना घडली असून, या कृत्यामुळे जगभरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंचल भौमिक हा नरसिंगडी येथील एका स्थानिक गॅरेजमध्ये काम करत होता आणि रात्रीच्या वेळी तिथेच झोपायचा. हल्लेखोरांनी अत्यंत पूर्वनियोजित कट रचून प्रथम गॅरेजचे शटर बाहेरून बंद केले आणि त्यानंतर पेट्रोल ओतून संपूर्ण इमारतीला आग लावली. धक्कादायक बाब म्हणजे, आगीच्या ज्वाळांमध्ये चंचलचा मृत्यू होत नाही तोपर्यंत हल्लेखोर बाहेरच उभे राहून पाहत होते. चंचलचा अंत झाल्याची खात्री पटल्यानंतरच हे हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.
चंचल हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता आधार होता. वडिलांच्या निधनानंतर त्याची आजारी आई, अपंग मोठा भाऊ आणि लहान भाऊ अशा सर्वांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. गेल्या सहा वर्षांपासून तो प्रामाणिकपणे गॅरेजमध्ये काम करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होता. गॅरेज मालकाने दिलेल्या माहितीनुसार, चंचल अत्यंत शांत स्वभावाचा होता आणि त्याचे कोणाशीही वैर नव्हते. त्यामुळे ही हत्या केवळ धार्मिक द्वेषातूनच करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी केला आहे.

बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी शरीयतपूर जिल्ह्यात खोकोन दास या ५० वर्षीय व्यावसायिकाला जमावाने अमानुष मारहाण करून पेटवून दिले होते, तर गारमेंट कामगार दिपू चंद्र दास यालाही विवस्त्र करून जिवंत जाळण्यात आले होते. या एकामागून एक घडणाऱ्या हत्यांच्या घटनांमुळे बांगलादेशातील हिंदू समुदायामध्ये दहशतीचे वातावरण आहे. या सततच्या हल्ल्यांमुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंध अधिकच तणावाचे बनले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
