विजय हजारे करंडक प्रथमच विदर्भाकडे

सौराष्ट्राचा ३८ धावांनी पराभव

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
विजय हजारे करंडक प्रथमच विदर्भाकडे

बंगळूरू : विदर्भ संघाने इतिहास रचत पहिल्यांदाच विजय हजारे करंडकावर नाव कोरले आहे. विदर्भ संघाने बंगळूरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे झालेल्या अंतिम सामन्यात विदर्भाने दोन वेळा विजेत्या सौराष्ट्र संघावर ३८ धावांनी मात केली. हा विदर्भ संघाचा देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेटमधील पहिला मोठा किताब आहे.
या विजयाचा नायक ठरला अथर्व तायडे, ज्याने शानदार १२८ धावांची खेळी साकारत विदर्भाला ८ बाद ३१७ अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली. प्रत्युत्तरात सौराष्ट्रचा संघ २७९ धावांत सर्वबाद झाला. गोलंदाजीत यश ठाकूरने ४ बळी घेत निर्णायक भूमिका बजावली.
सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विदर्भकडून अथर्व तायडे आणि अमन मोखाडे यांनी डावाची सुरुवात करत ७८ धावांची भागीदारी केली. अमन मोखाडे बाद झाल्यानंतर अथर्वने यश राठोड सोबत शतकी भागीदारी रचली.
अथर्व तायडेने ११८ चेंडूत १२८ धावा केल्या. ज्यामध्ये १५ चौकार, २ षटकारांचा समावेश होता. अथर्वने आपले शतक ९७ चेंडूत पूर्ण केले. हे त्याचे या स्पर्धेतील पहिले, तर लिस्ट-ए क्रिकेटमधील तिसरे शतक ठरले. सौराष्ट्रकडून अंकुर पंवार याने ४ बळी घेतले.
३१८ धावांचा पाठलाग करताना सौराष्ट्रची सुरुवात अत्यंत खराब झाली. दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले. हरविक देसाई २० धावा तर विश्वराज जडेजा ९ धावा करून बाद झाले. मधल्या फळीत प्रेरक मांकड (९२ चेंडूत ८८ धावा) आणि चिराग जानी (६३ चेंडूत ६४ धावा) यांनी झुंज दिली, मात्र संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाही. विदर्भकडून नचिकेत भुतेने ३, दर्शन नळकांडे २ व यश ठाकूरने ४ बळी घेतले.
ऐतिहासिक विजय
हर्ष दुबे यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाने उपांत्य फेरीत गतविजेत्या कर्नाटकचा पराभव केला होता, तर सौराष्ट्रने पंजाबला हरवून अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम सामन्यात विदर्भाने उत्कृष्ट सांघिक खेळ करत पहिल्यांदाच विजय हजारे करंडकावर नाव कोरले. हा विजय विदर्भ क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक आणि सुवर्णक्षण ठरला आहे.