
महानगरपालिकांतील निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. ठाणे महापालिकेचे निकाल प्रस्थापितांना धक्का देणारे आणि राजकीय समीकरण बदलणारे ठरले आहेत. महापालिकेतील मुंब्रा विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून ते सलग तीन वेळा विजयी झाले आहेत. या निवडणुकीत एआयएमआयएमने त्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला. कधी काळी आव्हाड यांचे उजवे हात मानले जाणारे, पक्षाच्या स्थापनेपासून ब्लॉक अध्यक्ष असलेले युनूस शेख आणि त्यांची कन्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांनीच आव्हाडांसमोर आव्हान उभे केले आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत कळवा आणि मुंब्रा भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटांत थेट लढत होईल, असे चित्र होते. आमदार जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला जोरदार प्रचार करत होते. मात्र, राष्ट्रवादीच्या मत विभाजनाचा फायदा एमआयएमला झाला. प्रभाग ३० मधून एमआयएमचे नफिस अन्सारी, सहर युनूस शेख, शेख सुलताना अब्दुल मन्नान आणि डोंगरे शोएब फरीद हे चारही उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज विजयी उमेदवारांच्या मतांपेक्षा जास्त होते.
राज्यातील २९ पैकी १३ महापालिकांमध्ये एकूण १२५ जागांवर एमआयएमने विजय मिळवला. ठाणे पालिकेत ५ उमेदवार निवडून आले. काही वर्षांपूर्वी प्रचारावेळी जितेंद्र आव्हाड आणि युनूस शेख यांच्यात बाचाबाची झाली होती. महापालिका निवडणुकीवेळी युनूस शेख यांनी कन्या सहर शेख हिच्यासाठी शरद पवार गटाची उमेदवारी मागितली होती. उमेदवारी नाकारल्याने सहर यांनी एमआयएमची उमेदवारी घेतली. सहर शेख यांची विजयी मिरवणूक, सभा सोशल मीडियावर चर्चेची ठरली. सभेत सहर म्हणाल्या, ‘शेर के बच्चे को हराने के लिए पुरी की पूरी गिधड की फौज तैनात करनी पडी. ‘तुतारी’ को कैसे हराया. आपण त्या लोकांच्या अहंकाराच्या चिंधड्या उडवल्या. काहींना वाटत होते, आम्ही त्यांचे गुलाम आहोत; पण आमच्यासाठी फक्त अल्लाह सर्वोच्च आहे. आम्ही कोणाच्या बापाचे मिंधे नाही. पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल, तेव्हा संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचा आहे.’ ‘संपूर्ण मुंब्रा हिरवा करू’ याचा अर्थ काय, असे विचारले असता सहर म्हणाल्या, माझ्या पक्षाचा झेंडा हिरवा आहे. त्यामुळे ‘मुंब्रा हिरवा करायचा आहे’, असे म्हणाले. आम्ही सेक्युलर आहोत. आम्हाला पायाभूत सुविधा, शाळा, रोजगार या विषयांवर काम करायचे आहे.
सभेत युनूस शेख यांनीही आव्हाडांना जाहीर इशारा दिला. ते म्हणाले, ‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा मी परिस्थिती आणखी बिकट करेन. तुम्ही ज्यांना घेऊन फिरत आहात ते काहीच नाहीत, खरे सिंह आमच्याकडे आहेत.’ आगामी विधानसभा निवडणुकीत मुंब्र्यात आव्हाड विरुद्ध एमआयएम असा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
- प्रदीप जोशी