महाराष्ट्रावर शोककळा : विमानातील इतर चार जणांचा मृत्यू, देशभरातून श्रद्धांजली

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थ व नियोजन मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. या अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.
अजित पवार मुंबईहून बारामतीला एका खासगी विमानाने जात होते. हे विमान व्हीटी-एसएसके नोंदणी क्रमांकाचे बॉम्बार्डियर लिअरजेट ४५ मॉडेलचे होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीत त्यांच्या अनेक सभा नियोजित होत्या. ते सकाळी ८.१० वाजता मुंबईहून रवाना झाले होते.
धावपट्टीवरून घसरून भीषण अपघात
महाराष्ट्र विमान वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, बारामती विमानतळावर उतरताना धावपट्टी स्पष्ट दिसत नसल्याने वैमानिकाने प्रथम ‘गो-अराउंड’ करत विमान पुन्हा वर नेले. दुसऱ्यांदा धावपट्टी ११ वर उतरण्याचा प्रयत्न करत असताना विमान धावपट्टीवरून घसरले आणि त्याला भीषण आग लागली. सकाळी सुमारे ८.४५ वाजता हा अपघात झाला. अपघातात विमानाचे अक्षरशः तुकडे झाले. विशेष म्हणजे लँडिंगदरम्यान वैमानिकाने कोणताही ‘मेडे कॉल’ किंवा आपत्कालीन सिग्नल दिला नव्हता.
राज्यात तीन दिवसांचा दुखवटा
अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून शाळा, महाविद्यालये व शासकीय संस्थांना सुट्टी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने बारामतीला पोहोचले.
आज अंत्यसंस्कार
अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह महाराष्ट्रातील व देशातील अनेक नेते अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, राहुल गांधी, नितीन गडकरी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून सांत्वन केले.
महाराष्ट्राचे विक्रमी सहा वेळा उपमुख्यमंत्री
२२ जुलै १९५९ रोजी जन्मलेले अजित पवार १९८२ साली राजकारणात सक्रिय झाले. काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सहकार व राजकारणात वाटचाल सुरू केली. ते महाराष्ट्राचे विक्रमी सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिले. सध्याच्या सरकारमध्ये ते अर्थ व नियोजन मंत्री होते. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करणार होते.
साडे चार दशकांची राजकीय कारकीर्द
अजित पवार यांचे मूळ गाव बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. त्यांनी १९९५ पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. शेवटच्या श्वासापर्यंत ते सक्रिय राजकारणात होते. प्रशासनावर पकड, थेट आणि स्पष्ट वक्तव्ये, कार्यकर्त्यांवरील दरारा आणि राजकीय विरोधकांनाही तितक्याच कठोर शब्दांत उत्तर देण्याची शैली यामुळे ते ‘दादा’ म्हणून ओळखले जात होते.
असा होता शेवटचा प्रवास…
* सकाळी ०८:१८ वा. ‘व्हीटी-एसएसके’ विमानाचा बारामती एटीसीशी पहिला संपर्क.
* पुण्याहून बारामतीकडे येताना ३० नॉटिकल मैलावर असताना विमानाचा ताबा बारामती एटीसीकडे देण्यात आला.
* धावपट्टी ११ वर उतरण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी; ‘गो-अराउंड’चा निर्णय.
* दुसऱ्या प्रयत्नात सुरुवातीला धावपट्टी दिसत नसल्याचे वैमानिकाने कळवले; नंतर ‘रनवे दिसत आहे’ असा संदेश.
* सकाळी ८:४३ ला लँडिंगची परवानगी; ८:४४ वा. धावपट्टीच्या सुरुवातीलाच आगीचा लोळ.
ब्लॅक बॉक्स सापडला
अपघातग्रस्त विमानाचा फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) असलेला ब्लॅक बॉक्स सापडला असून, फॉरेन्सिक आणि तपास टीम त्याचे विश्लेषण करत आहे. यामुळे अपघाताचे नेमके कारण लवकरच स्पष्ट होईल.
अजित पवारजी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना आदर होता. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेल्या 3 दशकाहून अधिक काळ वावरणाऱ्या अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिलेले आहे. त्याना भावपूर्ण श्रद्धांजली.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा
अजित पवार यांचे निधन ही अत्यंत दुःखद आणि विश्वास न बसणारी घटना असून, महाराष्ट्राने एक लोकप्रिय लोकनेते गमावले आहेत. अजित पवार हे कामाशी बांधील आणि तळागाळातील प्रश्नांची समज असणारे नेते होते. त्यांच्या निधनाने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र 
हा निव्वळ अपघात आहे, यात राजकारण नाही !
अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला जबर धक्का बसला असून निर्णयक्षमता आणि कर्तृत्व असलेला नेता राज्याने गमावला आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. झालेले नुकसान कधीही भरून न निघणारे असून, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. या दुर्घटनेमागे कोणतेही राजकारण नसून हा निव्वळ अपघात आहे. या घटनेतून राजकीय अर्थ काढण्याचा प्रयत्न करू नये आणि कोणीही यावर राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.