युनिटी मॉल, प्रशासन स्तंभ चिंबलमध्ये होणार नाहीत

सरकारचा अधिकृत निर्णय : ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th January, 11:56 pm
युनिटी मॉल, प्रशासन स्तंभ चिंबलमध्ये होणार नाहीत

पणजी : चिंबल (Chimbal) येथील युनिटी मॉल (Unity Mall) आणि प्रशासन स्तंभ (Administration Tower) हे दोन्ही प्रकल्प अन्य ठिकाणी हलविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गावकऱ्यांच्या भावना आणि भावनिक बाबी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे पर्यटन खात्याने बुधवारी रात्री जाहीर केलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे.
युनिटी मॉल प्रकल्पाविरोधात चिंबल ग्रामस्थांनी २८ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले होते. आंदोलनाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर अखेर सरकारने प्रकल्प स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. याआधी आंदोलकांनी जाहीर सभा तसेच अधिवेशन काळात विधानसभेवर मोर्चा काढला होता. त्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे चिंबल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, दीर्घकाळ सुरू असलेल्या आंदोलनाला यश आले आहे.

सर्वेक्षणानंतर सरकारचा निर्णय
चिंबल तळे आणि प्रस्तावित युनिटी मॉल परिसराचे सर्वेक्षण बुधवारी पूर्ण झाले असून त्याचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. या अहवालानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, प्रकल्पाचा डीपीआर व सर्वेक्षण अहवालाचा अभ्यास झाल्यानंतरच चर्चा करू, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने बैठक झाली नाही. त्यानंतर लगेचच दोन्ही प्रकल्पांचे स्थलांतर करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
युनिटी मॉल प्रकल्प हा चिंबल तळ्याच्या प्रभाव क्षेत्रात किंवा पाणथळ भागात येत नसल्याचे विधानसभेत माझ्यासह पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले होते, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. आम्ही योग्य तेच बोललो, मात्र लोकांनी या प्रकल्पाला विरोध का केला हे मला माहीत नाही, असेही त्यांनी म्हटले.