राज्यात दिवसाला सरासरी १३७ जणांना मधुमेहाचे निदान

एका वर्षात ५० हजार नवे रुग्ण : बदलत्या जीवनशैलीचा गोमंतकीयांना फटका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th January, 08:48 pm
राज्यात दिवसाला सरासरी १३७ जणांना मधुमेहाचे निदान

पणजी : गोव्यात बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्य विषयक समस्यांनी गंभीर रूप धारण केले आहे. राज्यात डिसेंबर २०२४ ते डिसेंबर २०२५ या एका वर्षाच्या कालावधीत मधुमेह (टाईप २) झालेल्या तब्बल ५० हजार १६३ रुग्णांची नोंद झाली आहे. याचा अर्थ राज्यात दररोज सरासरी १३७ जणांना मधुमेहाचे निदान होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

धावपळीचे जीवन आणि बदललेल्या आहारपद्धतीमुळे राज्यातील नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार, लठ्ठपणा, वंध्यत्व आणि पक्षाघात यांसारखे विविध आजार जडत आहेत. एका वर्षात ५० हजारांहून अधिक रुग्ण सापडल्याने, महिन्याला सरासरी ४,१८० नागरिक मधुमेहाच्या विळख्यात सापडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गोमेकॉतील रुग्णांची आकडेवारी (२०२२-२०२४)

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (GMC) मागील तीन वर्षांतील मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

वर्ष मधुमेह रुग्ण उच्च रक्तदाब रुग्ण
२०२२ ५,२५१ ६,७१६
२०२३ ५,३११ ६,७३८
२०२४ ४,५३८ ५,८३१

गंभीर आजारांचा वाढता आलेख

२०२२ ते २०२४ या तीन वर्षांच्या कालावधीत इतर गंभीर आजारांची स्थिती देखील चिंताजनक आहे. यामध्ये प्रामुख्याने हृदयविकार आणि किडनीच्या आजारांचा समावेश आहे.

आजाराचा प्रकार एकूण रुग्ण (२०२२-२४)
‘इस्केमिक’ हृदय रोग ७,३६०
एकूण कर्करोग रुग्ण ३,८९७
क्रॉनिक किडनी आजार (CKD) २,४३४
लिव्हर सिरोसिस २,१८०

स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक

तीन वर्षांत आढळलेल्या ३,८९७ कर्करोग रुग्णांपैकी सर्वाधिक प्रमाण हे स्तनांच्या कर्करोगाचे आहे. यात ९३४ (२४ टक्के) रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल जठर आणि आतड्यासंबधित कर्करोगाचे ५९८ रुग्ण आढळून आले आहेत.

#GoaHealth #DiabetesCrisis #GMCStats #GoaNews #HealthAwareness