पंचायतीचा निर्णय

इंदोर : भारतात (India) कायद्याने सज्ञान व्यक्तीला आपल्या पसंतीने लग्न (Marriage) करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, देशात काही भागांत प्रेम विवाह (Love marriage) केल्यास युवक युवतींना व त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक छळाला सामोरे जावे लागते. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रतलाम जिल्ह्यातील पंचेवा या गावात एक वेगळाच फतवा काढण्यात आला आहे. गावातील युवक युवतींनी प्रेमविवाह केल्यास त्यांच्या कुटुंबांवर सामूहिक सामाजिक, आर्थिक बहिष्कार टाकण्याची घोषणा करण्यात आली आहे. पंचायतीत विषयी निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पंचेवा ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला आहे की, गावातील युवक युवतींनी प्रेम करून पळून जाऊन विवाह केल्यास त्यांच्यावर व त्यांच्या पूर्ण कुटुंबांवर सामूहिक बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे व्हिडीओतील युवक सांगतो. सामाजिक कार्यक्रमाचे आमंत्रण ही त्यांना देण्यात येणार नाही. प्रेमविवाह करताना जो कुणी साक्षीदार होणार; त्यांच्यावरही बहिष्कार घालण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. प्रेमविवाह केलेल्या ३ कुटुंबांची नावेही या व्हिडीओत घेण्यात आली आहेत. या प्रकरणाची स्थानिक प्रशासनाने दखल घेतली असून, संबंधितांवर कारवाई सुरू झाली आहे.
दरम्यान, यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक अमित कुमार यांनी सांगितले की, गावातील लोकांशी चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यांच्याशी संवाद साधला जात असून, असा निर्णय घेणे चुकीचे असल्याचे त्यांना पटवून दिले जात आहे.