तांत्रिक बिघाड की मानवी चुकीमुळे घडली दुर्घटना ? डीजीसीएचा तपास सुरू

बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र हादरला असून, बारामती विमानतळाजवळ झालेल्या या भीषण विमान अपघाताबाबत आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रत्यक्षदर्शींनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या काही मिनिटे आधी हे विमान जमिनीपासून अवघ्या १०० फूट उंचीवर असताना अचानक अनियंत्रित झाले आणि कोसळले. विशेष म्हणजे, अपघातग्रस्त 'लिअरजेट-४५' हे विमान लँडिंगपूर्वी सुमारे ३५ मिनिटे हवेतच घिरट्या घालत होते. विमानात काहीतरी गंभीर तांत्रिक बिघाड झाला असावा किंवा लँडिंगसाठी पोषक वातावरण नसावे, असा संशय बळावला आहे. डीजीसीएचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे.
अजित पवार यांनी सकाळी ८:१० वाजता मुंबईहून बारामतीसाठी उड्डाण केले होते. बारामती परिसरात पोहोचल्यावर वैमानिकाने दोनवेळा लँडिंगचा प्रयत्न केला. एअर ट्रॅकर 'फ्लाईट रडार २४' नुसार, दुसऱ्या प्रयत्नावेळी विमान धावपट्टीच्या अतिशय जवळ आले होते, मात्र अचानक ते पुन्हा हवेत झेपावले आणि काही क्षणांतच जमिनीवर आदळले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, विमानाचा आवाज खूपच विचित्र येत होता आणि जमिनीवर आदळताच मोठा स्फोट होऊन विमानाने पेट घेतला. धुक्यामुळे झालेली कमी दृश्यमानता (लो विझिबिलिटी) हे देखील अपघाताचे एक संभाव्य कारण मानले जात आहे.
ज्या 'व्हीएसआर व्हेंचर्स' कंपनीचे हे विमान होते, त्यांच्या सुरक्षेबाबत आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याच कंपनीचे विमान २०२३ मध्ये मुंबईतही अशाच प्रकारे अपघातग्रस्त झाले होते. जरी कंपनीचे संचालक हे विमान सुरक्षित असल्याचा दावा करत असले, तरी १६ वर्षे जुन्या या विमानात नेमका काय बिघाड झाला, याचा शोध आता 'ब्लॅक बॉक्स'च्या माध्यमातून घेतला जाईल. नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, इंजिनमधील बिघाड, वेक टर्ब्युलन्स,कमी दृश्यमानता किंवा 'पायलट एरर' या सर्व शक्यता पडताळल्या जात आहेत. कॅप्टन सुमित कपूर हे अनुभवी वैमानिक असतानाही हा अपघात घडल्याने हवाई क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
