चोर्लाघाटात ४०० कोटींची लूट; कर्नाटक काँग्रेस-भाजपमध्ये खडाजंगी

एकमेकांवर केले गंभीर आरोप

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
चोर्लाघाटात ४०० कोटींची लूट; कर्नाटक काँग्रेस-भाजपमध्ये खडाजंगी

बेळगाव: कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांच्या सीमेवरील चोर्ला घाटात २,००० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील सुमारे ४०० कोटी रुपयांची कथित लूट झाल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेने आता तीव्र राजकीय वळण घेतले असून, सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.




या प्रकरणाचा उलगडा संदीप पाटील नावाच्या व्यक्तीने नाशिकमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर झाला. या घटनेवरून कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी भाजपवर निशाणा साधत, महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याशी या पैशांचे कनेक्शन जोडले आहे. एवढी मोठी रक्कम भाजप शासित राज्यांच्या नाकाखाली इतकी बेमालुम कशी काय फिरत होती? असा सवाल करत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली आहे. 


Contractor's suicide: Karnataka BJP demands CBI probe and minister Priyank  Kharge's ouster | Bangalore News - The Indian Express


दुसरीकडे, भाजपने हे आरोप फेटाळून लावत काँग्रेसवरच निवडणुकांसाठी हा पैसा वापरत असल्याचा प्रतिआरोप केला आहे.भाजप नेते चलावादी नारायणस्वामी यांनी काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसशासित तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतून निवडणुकीसाठी निधी उभारणे शक्य नसल्याने, कर्नाटक हे काँग्रेससाठी प्रमुख आर्थिक स्त्रोत बनले आहे. राज्यातील जनतेचा पैसा इतर राज्यांतील निवडणुकांसाठी वळवला जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी यावेळी केला.


भाजपा ने नारायणस्वामी को विधानसभा में विपक्ष का नेता चुना - द हिंदू


नारायणस्वामी यांनी सिद्धरामय्या सरकारच्या 'गृहलक्ष्मी' गॅरंटी योजनेवरूनही निशाणा साधला. फेब्रुवारी आणि मार्च २०२५ या दोन महिन्यांसाठी महिलांना दिल्या जाणाऱ्या ५,००० कोटी रुपयांचे वाटप अद्याप सरकारने केलेले नाही. सुरुवातीला सर्व देयके दिल्याचे सांगणाऱ्या सरकारने नंतर स्वतःच पैसे दिले नसल्याची कबुली दिली, हे केवळ काँग्रेस सरकारच करू शकते, अशी टीका त्यांनी केली. योजनेचा पैसा निवडणुकांकडे वळवला जात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.




कायदेशीर पातळीवर, नाशिक पोलिसांनी याप्रकरणी सहा संशयितांना अटक केली असून विशेष तपास पथक (एसआयटी) बेळगावकडे रवाना झाले आहे. बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक पोलीस अधीक्षकांनी या लुटीबाबत अधिकृत पत्र पाठवून कळवले आहे. मात्र, अद्याप कर्नाटकात कोणताही औपचारिक गुन्हा दाखल झालेला नाही. चोर्ला घाट हा तिन्ही राज्यांच्या सीमेवर असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. या कथित लुटीतील पैसा नेमका कोणाचा होता आणि तो कोठे नेला जात होता, याचा शोध घेण्यासाठी आता महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत

हेही वाचा