
मडगाव: कोलवा पोलिसांनी प्रजासत्ताक दिनाच्या पहाटे वार्का येथे एका फ्लॅटवर धाड टाकून दोन लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून एमडीएमए, गांजा आणि चरस हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कोलवा पोलिसांनी २६ जानेवारी रोजी पहाटे ५:५० ते सकाळी ९:३० वाजेच्या दरम्यान वार्का येथील 'आसंव वेर्डे' इमारतीतील एका फ्लॅटवर छापा टाकला. या कारवाईत दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले. संशयित आकाश सजीथ (३६, रा. वार्का) याच्याकडून १,३५,८०० रुपये किमतीचे ६.७९ ग्रॅम एमडीएमए आणि २४,३०० रुपये किमतीचे २.४३ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले. तर, संशयित प्रतीक बर्मन (४१, रा. वार्का) याच्याकडून ४०,४०० रुपये किमतीचे २.०२ ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आले. या छाप्यात पोलिसांनी एकूण २,००,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक टीकम सिंग वर्मा आणि उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवा पोलीस निरीक्षक विक्रम नायक, उपनिरीक्षक प्रथमेश महाले आणि उपनिरीक्षक निखिल खाजणेकर यांनी केली. संशयितांविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून, कोलवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.