सुदैवाने जीवितहानी टळली

पणजी: पर्वरी येथील अटल सेतूवर रविवारी एका चालत्या कारला भीषण आग लागली. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कार पुलावरून जात असताना अचानक त्यातून धूर येऊ लागला आणि काही वेळातच आगीच्या ज्वालांनी संपूर्ण वाहनाला वेढले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. यादरम्यान पुलावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली. अग्निशमन दलाने आग विझवून सुरक्षिततेची खात्री केल्यानंतर पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत करण्यात आली.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी, प्राथमिक अंदाजानुसार कारमधील तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे. ऐन गर्दीच्या वेळी पुलाच्या मध्यभागी लागलेल्या या आगीमुळे परिसरात धुराचे काळे लोट पसरले होते, ज्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.