
जोयडा: रामनगर-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाट परिसरात दुचाकीचा भीषण अपघात होऊन जोयडा तालुक्यातील कुरवई येथील एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. सचिन सावर्डेकर असे मृताचे नाव असून, या अपघातात अमर ठाकूर (रा. सोनारवाडी) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना रात्री नऊच्या सुमारास अनमोड घाटातील आरटीओ तपासणी नाक्याजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन आणि अमर हे दोघेही दुचाकीवरून गोव्याच्या दिशेने जात होते. अनमोड घाट परिसरात दुचाकीचा ताबा सुटल्याने ती थेट रस्ता दुभाजकाला (डिव्हायडर) जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रामनगर येथे उपचारासाठी नेण्यात आले. सचिन सावर्डेकर याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी बेळगावला नेण्याचा सल्ला दिला, मात्र बेळगावकडे नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.
मृत सचिन सावर्डेकर हा गोव्यातील एका खासगी कंपनीत नोकरीला होता, तर जखमी अमर ठाकूर हा उद्योजक असून त्याच्यावर सध्या रामनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कुरवई परिसरात शोककळा पसरली आहे. रामनगर पोलिसांनी या प्रकरणी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.