मांद्रे पोलिसांची मोठी कारवाई

पेडणे: गोव्याच्या किनारपट्टी भागात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश आले असून, मांद्रे पोलिसांनी मोरजी येथे धाड टाकून ४ लाख ७२ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी मोद्दिन तालेवेगार (३८, रा. हावेरी, कर्नाटक) याला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली असून त्याच्याकडून सुमारे पावणेपाच किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ जानेवारी रोजी रात्री मोरजी येथील खिंड परिसरात अमली पदार्थांची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मांद्रे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अभिषेक चोडणकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रात्री ९ ते १०.३० च्या दरम्यान सापळा रचला. येथील एका पार्किंग परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या मोद्दिन याची झडती घेतली असता, त्याच्याकडे हिरवट रंगाचा ४.७२२ किलो वजनाचा गांजासदृश्य पदार्थ सापडला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करून संशयिताला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (NDPS) कलम २० (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा अमली पदार्थ नेमका कुठून आणला होता आणि किनारपट्टी भागात तो कोणाला पुरवला जाणार होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे एखाद्या मोठ्या आंतरराज्य टोळीशी जोडलेले असण्याची शक्यता असून, पोलीस त्या दृष्टीने सखोल चौकशी करत आहेत.