मुख्यमंत्र्यांचे प्रजासत्ताक दिनी गोमंतकीय जनतेला आवाहन

पणजी: देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. भारताला एक स्वतंत्र आणि लोकशाही राष्ट्र बनवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना तसेच भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पणजीत आल्तिन्हो येथील महालक्ष्मी बंगल्यावर त्यांनी ध्वजारोहण केले.
आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणाले की, २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा सोहळा आहे. राष्ट्र उभारणीच्या प्रवासातील हा एक ऐतिहासिक टप्पा असून, नागरिक म्हणून आपण मूलभूत हक्कांचा आनंद घेत असतानाच, लोकशाही तत्त्वे सर्वोच्च ठेवण्यासाठी आपल्या मूलभूत कर्तव्यांचेही पालन केले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. राज्यघटनेच्या शिल्पकारांनी देशाला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी दिलेले योगदान सर्वांनी लक्षात ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्याच्या विकासाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, गोवा सरकार पायाभूत सुविधा, सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षणाच्या संधी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी निरंतर प्रयत्नशील आहे. समृद्ध राष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी धर्मनिरपेक्ष, लोकशाहीच्या मूल्यांचे जतन व संरक्षण केले पाहिजे. आपल्या सुंदर गोव्याच्या प्रगतीत योगदान देऊन 'स्वयंपूर्ण गोवा' आणि 'आत्मनिर्भर भारत' घडवण्याचा सामूहिक संकल्प करूया, असे आवाहन डॉ. सावंत यांनी या प्रसंगी केले.