प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्य दलाच्या ७० अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार जाहीर केले असून त्यात सहा पुरस्कार मरणोत्तर दिले जाणार आहेत .

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्य दलाच्या ७० अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार जाहीर केले असून त्यात सहा पुरस्कार मरणोत्तर दिले जाणार आहेत. या सुवर्ण सोहळ्यात गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

लष्कराच्या हवाई संरक्षण विभागाचे महासंचालक आणि गोव्याचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल सुमेर इव्हान डी’कुन्हा यांना त्यांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेसाठी ‘परम विशिष्ट सेवा पदक’ (PVSM) देऊन सन्मानित करण्यात आले. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये त्यांनी बजावलेली दैदीप्यमान कामगिरी आणि लष्करी नेतृत्वातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन हा उच्च लष्करी सन्मान प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्यासोबतच गोव्याचे आणखी एक सुपुत्र लेफ्टनंट जनरल मायकल अँथनी ज्यूड फर्नांडिस यांनाही त्यांच्या अपवादात्मक सेवा आणि नेतृत्वासाठी प्रतिष्ठित 'परम विशिष्ट सेवा पदक' देऊन गौरविण्यात आले आहे.

अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना सर्वोच्च 'अशोक चक्र' सन्मान
यावेळी अंतराळ संशोधन क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचा ठसा उमटवणारे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार 'अशोक चक्र' जाहीर करण्यात आला. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरून इतिहास घडवल्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे. ऐतिहासिक 'ॲक्सिओम-४' मोहिमेअंतर्गत त्यांनी १८ दिवसांचा अंतराळ प्रवास पूर्ण केला. विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर ४१ वर्षांनी हा पराक्रम संधी करणारे ते पहिलेच भारतीय आहेत. सामान्यतः अत्यंत कठीण परिस्थितीत लष्करी धैर्य दाखवणाऱ्या जवानांना दिला जाणारा हा सन्मान शुक्ला यांना देऊन सरकारने अंतराळ क्षेत्राचे वाढते महत्त्व अधोरेखित केले आहे.

सैन्य दलातील ७० अधिकाऱ्यांचा शौर्य पुरस्काराने गौरव
राष्ट्रपतींनी यंदा एकूण ७० लष्करी अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार जाहीर केले असून, त्यापैकी सहा पुरस्कार मरणोत्तर दिले जाणार आहेत. यामध्ये एक अशोक चक्र, तीन कीर्ती चक्र आणि १३ शौर्य चक्रांचा समावेश आहे. कीर्ती चक्राच्या मानकऱ्यांमध्ये मेजर अर्शदीप सिंग, नायब सुभेदार दोलेश्वर सुब्बा आणि 'गगनयान' मोहिमेचे प्रशिक्षण घेणारे ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर यांचा समावेश आहे. भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए या दोन महिला अधिकाऱ्यांनाही 'शौर्य चक्र' देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी 'आयएमएसव्ही तारिणी' नौकेवरून २१,६०० सागरी मैलांचा प्रवास करून पृथ्वीपरिक्रमा पूर्ण करण्याचे ऐतिहासिक धाडस दाखवले होते.

याशिवाय, राष्ट्रपतींनी सशस्त्र दलांसाठी ३०१ सेवा पदके जाहीर केली असून, त्यात परम विशिष्ट सेवा पदके, उत्तम युद्ध सेवा पदके आणि अति विशिष्ट सेवा पदकांचा समावेश आहे. देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी बलिदान देणाऱ्या आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर भारताची मान उंचावणाऱ्या प्रत्येक वीर पुत्राच्या कर्तृत्वाचा हा यथोचित सन्मान ठरला आहे.