
मुंबई : महाराष्ट्राचे (Maharashtra) उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमानाला बारामती (Baramati) विमानतळावर उतरताना अपघात झाला. या अपघातात पाच ते सहाजण ठार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीत सभा होणार होत्या. त्यासाठी अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीत गेले होते. विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात झाला व जवळच्या शेतात कोसळले. विमानात कोणकोण होते यासंदर्भात अजून माहिती मिळालेली नाही.

निवडणूक प्रचारासाठी अजित पवार एका खाजगी चार्टर्ड विमानाने मुंबईहून बारामतीला गेले होते. विमानात अजित पवार यांच्यासहीत त्यांचे पीए आणि इतर सहकारी होते. या अपघातात त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

विमानात अजित पवार यांच्या सोबत इतर दोन कर्मचारी, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी आणि एक व्यक्ती आणि मुख्य पायलट व फर्स्ट ऑफिसर यांच्यासह दोन क्रू सदस्य होते. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात विमानात असलेल्यांपैकी कोणीही वाचलेले नाही.
सूत्रांनी सांगितले की, अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीशी संबंधित एका कार्यक्रमासाठी बारामतीला जाणार होते. ते मंगळवारी मुंबईत होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीला उपस्थित होते. अपघाताच्या ठिकाणच्या दृश्यांमध्ये विमान आगीच्या ज्वाळांनी वेढलेले दिसत होते. तर स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके घटनास्थळी जमली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत अनेकांकडून श्रद्धांजली
अजित पवार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्याला उजाळा देत तीव्र शोक व्यक्त करीत श्रद्धांजली वाहिली आहे.