बारामतीत लँडिंगवेळी काळाचा घाला. डीजीसीएचे पथक घटनास्थळी दाखल

बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या दुर्दैवी घटनेत विमानातील वैमानिकांसह इतर चार जणांचाही मृत्यू झाला असून, संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
जाणून घ्या नेमके काय घडले
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती येथे चार सभांना संबोधित करण्यासाठी मुंबईहून चार्टर्ड विमानाने निघाले होते. सकाळी ८:४५ च्या सुमारास त्यांचे 'लिअरजेट ४५' हे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना हा भीषण अपघात घडला. धावपट्टीवर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाला नेमका अंदाज न आल्याने विमान रनवेवरून घसरले आणि जोराने जमिनीवर आदळले. विमान आदळताच त्याने भीषण पेट घेतला. यात संपूर्ण विमान जळून खाक झाले.

नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) या अपघातात विमानातील पाचही जणांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली आहे. मृतांमध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा रक्षक आणि दोन वैमानिकांचा समावेश आहे. अपघाताची बातमी समजताच बारामतीकरांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दिल्लीत असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुले हे तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, DGCA चे एक विशेष पथक तपासासाठी घटनास्थळी दाखल झाले असून, तांत्रिक बिघाड की मानवी चूक, याचा सविस्तर शोध घेतला जात आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
भीषण विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पाच व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
* अजित पवार : उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
* विदिप जाधव (HC) : अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी.
* कॅप्टन सुमित कपूर : मुख्य वैयक्तिक वैमानिक (पायलट).
* कॅप्टन शांभवी पाठक : सह-वैमानिक (को-पायलट).
* पिंकी माली : फ्लाईट अटेंडंट.

पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान मोदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. 'अजित पवार हे तळागाळातील लोकांशी जोडलेले लोकनेते होते,' अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.