मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली माहिती

पणजी : तुये हॉस्पिटलात (Tuem Hospital) सल्लागार आणि परिचारिकांसहीत (नर्सेस) ९७ पदे कंत्राटावर भरण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. गोवा लोकसेवा आयोगामार्फत (जीपीएससी) भरती होईपर्यंत गोवा वैद्यकीय महाविद्यालय (Goa Medical College) तसेच आरोग्य खात्यातील (Health Department) पदे कंत्राटावर भरली जाणार, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
पर्वरी मंत्रालयात बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत निर्णयाची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. तुये हॉस्पिटलाचे उद्घाटन ठरल्याप्रमाणे २ फेब्रुवारीला होणार आहे. या हॉस्पिटलसाठी सल्लागार तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती कंत्राटावर करण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ५० परिचाकांसहीत (नर्सेस) एमटीएस, हाऊसकिपिंग मिळून ९७ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. हॉस्पिटलसाठी आणखी कर्मचाऱ्यांची नेमणूक करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजी, सर्जरी, ऑप्थोलमॉजी या विभागात लेक्चरर तसेच सहाय्यक प्राध्यापकांची १५ वर पदे कंत्राटी तत्त्वार भरण्यास मान्यता दिली आहे.
- बंदर कप्तान खात्याकडून (सीओपी) उपबंदर कप्तान या नव्या पदाची निर्मिती
- गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर (पोस्ट ग्रॅज्युएट) अभ्यासक्रमासाठी एससी, एसटी, ओबीसी जागा रोस्टर पद्धतीने भरणार.
- तिस्क- फोंडा येथे वैद्यकीय प्रकल्पासाठी कला, संस्कृती खात्याकडे असलेली जमीन आरोग्य खात्याच्या ताब्यात देण्यासाठी मान्यता.
- कर्मचाऱ्यांची कंत्राटावर नेमणूक
जीपीएससीने पदे भरेपर्यंत गोमेकॉतील पदे कंत्राटावर
अजित पवार यांना श्रद्धांजली
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर उपस्थितांनी एक मिनीट शांतता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली.