
पणजी : राष्ट्रीयकृत बँकेच्या (Nationalised Banks) कर्मचाऱ्यांना प्रत्येक शनिवारी सुट्टी देऊन कामाचा कालावधी आठवड्यातून ५ दिवस करावा; अशी मागणी युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (United Forum of Bank Union) वतीने करण्यात आली. यासाठी मंगळवारी विविध राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय संप केला. तसेच आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात राज्यभरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या ४५० हून अधिक शाखांतील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
याबाबत संघटनेचे मॅक्स परेरा यांनी सांगितले की, संपामध्ये ४ अधिकारी तर ५ अन्य कर्मचारी संघटनांनी सहभाग घेतला आहे. देशभरात केल्या जाणाऱ्या संपाचा हा एक भाग आहे. केंद्र व राज्य सरकारची खाती, एलआयसी (LIC) तसेच सार्वजनिक क्षेत्रातील अन्य उपक्रमांना प्रत्येक शनिवारी सुट्टी दिली जाते. मात्र; राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांना महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी काम करावे लागते. सुट्टी देण्याबाबत आमच्या संघटनांनी यादी केंद्र सरकारसोबत बोलून केली आहे.
यापूर्वी आम्ही आमची मागणी भारतीय बँकिंग संघटनेतर्फे (आयबीए) (IBA) केंद्र सरकारपर्यंत पोहोचवली आहे. यानंतर अधिकारी आणि कामगार संघटनांची आयबीएची बोलणी झाली होती. मार्च २०२४ मध्ये आम्हाला प्रत्येक शनिवारी सुट्टी देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र; त्यानंतर दोन वर्षे झाली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत आम्ही विविध केंद्रीय खात्यांकडे पाठपुरावा करत आहोत. आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण केली जावी; यासाठी आम्ही आज देशव्यापी संप पुकारला आहे.
चाळीस मिनिटे अतिरिक्त काम करण्यास तयार
परेरा म्हणाले की, आम्ही प्रत्येक शनिवारी सुट्टी मागत असलो तरी त्या ऐवजी दिवसाला ४० मिनिटे अधिक काम करण्याची आमची तयारी आहे. याबाबत आम्ही लेखी स्वरूपात आयबीएला कळवले आहे. आम्ही ग्राहकांची गैरसोय करण्यासाठी नव्हे तर आमच्या अधिकारांसाठी संपर्क करत आहोत.