आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांची माहिती

पणजी : चिंबल तळे (Chimble Lake) व प्रस्तावित युनिटी मॉल (Unity Mall) जागेचे उर्वरित सर्वेक्षण आज सायंकाळी सूरू होणार आहे. सर्वेक्षणानंतर अहवाल तयार झाल्यावर यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी (Chier Minister) बैठक होणार असल्याची माहिती युनिटी मॉलच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांनी दिली.
चिंबल येथे तळ्याच्या परिसरात युनिटी मॉल साकारल्यास त्याचा परिणाम येथील तळ्यावर व परिसरावर होणार असून, त्यामुळे तळ्याची हानी होणार आहे. त्याचा परिणाम या परिसरातील शेती व एकूण पर्यावरणावर पडणार असल्याचा दावा करीत येथील स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या कित्येक दिवसांपासून युनिटी मॉल प्रकल्प रद्द करावा; या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे.
युनिटी मॉल प्रकल्प रद्द करण्यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत व प्रकल्प रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा स्थानिक ग्रामस्थांनी घेतला आहे.
दरम्यान, युनिटी मॉल परिसरातील जागेचे उर्वरीत सर्वेक्षण आज सायंकाळी होणार असल्याची माहिती आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांनी दिली, मॉल परिसराचे सर्वेक्षण पूर्ण होऊन अहवाल तयार झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे बैठक होणार असल्याचे या ग्रामस्थांनी सांगितले.