युनिटी मॉलविरोधात ३० रोजी होणार महाआंदोलन

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
42 mins ago
युनिटी मॉलविरोधात ३० रोजी होणार महाआंदोलन

पणजी : चिंबल तळे (Chimbel Lake)  व प्रस्तावित युनिटी मॉलच्या (Unity Mall) परिसराचा सर्वेक्षण अहवाल पूर्ण झाल्यानंतरच आंदोलक व मुख्यमंत्री यांच्या दरम्यान चर्चा होणार आहे. यामुळे चर्चा कधी होईल, त्याची वेळ आताच सांगणे कठीण आहे. दरम्यान, युनिटी मॉल विरोधातील ग्रामस्थांचे आंदोलन सुरूच असून ३० जानेवारी रोजी महाआंदोलन होणार असल्याची माहिती अजय खोलकर यांनी दिली.

बैठकीत ठरल्याप्रमाणे चिंबल तळे व प्रस्तावित युनिटी मॉल जमिनीचे शनिवारी सर्वेक्षण सुरू झाले होते. सर्वेक्षणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल तज्ज्ञ मंडळी तयार करतील. हा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल. यानंतरच आंदोलक व मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती चिंबल ग्रामस्थांची बाजू मांडणाऱ्या वकील मेलीसा सिमोईस यांनी दिली. तत्पूर्वी चर्चा करण्यात कसलाच अर्थ नसल्याचे त्या म्हणाल्या. 

युनिटी मॉल प्रकल्पाविरोधात चिंबल ग्रामस्थांनी २८ डिसेंबर पासून साखळी उपोषण आंदोलन सुरू केले होते. उद्या आंदोलनाला एक महिना पूर्ण होणार आहे.  प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात निदर्शने करण्याच्या हेतूने चिंबल ग्रामस्थ सोमवारी विद्यापीठ मैदानावर चालून येत होते. पोलिसांनी रोखल्याने त्यांना विद्यापीठ मैदानावर प्रवेश करता आला नाही. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाकडे युनिटी मॉल प्रकल्पाबाबत चर्चा केली जाईल. आंदोलकांनी शांतता बाळगावी, असे आवाहन करीत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे मुख्यमंत्री व आंदोलकांमध्ये पुन्हा चर्चा होणार आहे.

हेही वाचा