बार्देश तालुक्यात चोरांचा धुमाकूळ; म्हापसा, पर्वरीतील घरफोडीत ५० लाखांचा ऐवज लंपास

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
59 mins ago
बार्देश तालुक्यात चोरांचा धुमाकूळ; म्हापसा, पर्वरीतील घरफोडीत ५० लाखांचा ऐवज लंपास

म्हापसा : गोव्यातील (Goa) बार्देश तालुक्यात (Bardez Taluka) गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी उच्छाद मांडला असून; म्हापसा (Mapusa), पर्वरी (Porvorim) आणि थिवी (Thivim) परिसरातील बंद घरांना लक्ष्य केले आहे. पेडे-म्हापसा येथील एका निवासी संकुलातील दोन फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुमारे ५० लाखांचे दागिने लंपास केले, तर पर्वरी आणि थिवी येथेही घरफोडीच्या मोठ्या घटना उघडकीस आल्या आहेत.

शुक्रवारी २३ जानेवारी रोजी पहाटे २ ते ४च्या सुमारास पेडे येथील एका संकुलात ही चोरी झाली. वैभव गावडे यांच्या फ्लॅटमधून १२ लाखांचे सोने, तर वैदिक श्रीवास्तव यांच्या फ्लॅटमधून ३० ते ४० लाखांचे सुवर्ण व चांदीचे अलंकार चोरीला गेले आहेत. गावडे कुटुंब फिरण्यासाठी बाहेर गेले होते, तर श्रीवास्तव हे बिट्स पिलानीचे विद्यार्थी असून ते आठवड्यातून एकदाच या फ्लॅटवर येत असत. सकाळी शेजाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

पर्वरीत सोन्याची नाणी लंपास

पर्वरी येथील देवश्री ग्रीन इमारतीमध्ये राहणारे किरण म्हांबरे यांचे कुटुंब मुंबईला गेले असता, त्यांच्या बंद फ्लॅटवर चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांनी १.५ लाख रुपये रोख, साडेचार लाख रुपये किमतीची १० सोन्याची नाणी आणि ५ चांदीची नाणी असा एकूण ६ लाखांचा मुद्देमाल पळवला आहे.

सुकूर, थिवी येथेही फोडले बंगले

चोऱ्यांचे सत्र एवढ्यावरच थांबले नसून मंगळवारी २७ जानेवारी रोजी जोसवाडो-सुकूर आणि माडेल-थिवी येथेही घरफोडीच्या घटना घडल्या. सुकूर ‍येथील येरंब कुटुंबीय नातेवाईकांकडे गेले असताना चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून मौल्यवान वस्तूंसह सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेला. तर थिवी फाज कॉलनीमधील मयूरम बालकृष्णन आणि सुनील बागायतकर यांचे बंद बंगले फोडण्यात आले. घरमालक परतल्यानंतरच चोरीच्या रकमेचा आकडा स्पष्ट होईल.

तपासासाठी पोलीस पथके परराज्यात

या सर्व चोऱ्यांमध्ये एकाच सराईत टोळीचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चोरट्यांनी घरांची आधी 'रेकी' केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येते. म्हापसा आणि पर्वरी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी काही पथके शेजारील राज्यांमध्ये रवाना करण्यात आली आहेत.

हेही वाचा