५ लाखांची फसवणूक करणारा तोतया प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी गजाआड

३ दिवसांची पोलीस कोठडी; गोव्यात ८ तर महाराष्ट्र व कर्नाटकात प्रत्येकी १ गुन्हा नोंद

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
21 mins ago
५ लाखांची फसवणूक करणारा तोतया प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी गजाआड

पणजी : गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा (Goa State Pollution Control Board)  अधिकारी असल्याचे भासवून काणकोण (Canacona)  येथील एका व्यावसायिकाला ५ लाखांचा गंडा घातल्या प्रकरणी गुन्हा अन्वेषण शाखेकडून सूरज पेंडसे (रा.आसगाव) याला अटक केली आहे. सध्या, त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  संशयिताविरुद्ध यापूर्वी गोव्यात आठ तर कर्नाटक (Karnataka) व महाराष्ट्रात (Maharashtra) प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे. 

गुन्हा शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, काणकोण येथील चेतन कोमरपंत यांनी सूरज पेंडसे याच्याविरुद्ध तक्रार केली होती. त्यात २८ मे २०२५ ते १० जुलै २०२५ दरम्यान सूरज याने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी असल्याची बतावणी करून बनावट कागदपत्रे तयार करून दिली. त्याच्या बदल्यात त्याच्याकडून अनेक वेळा मिळून सुमारे ५ लाख ३ हजार रुपये लाटले व फसवणूक केली. यासंदर्भात सविस्तर माहिती व आवश्यक कागदपत्रेही तक्रारदाराने गुन्हा शाखेला दिली. त्यानंतर पोलिसांनी सूरज याचा शोध घेतला असता; तो पुणे, महाराष्ट्र येथे असल्याचे मोबाईल लोकेशनवरून दिसून आले. त्यानंतर याप्रकरणात तपास करणारे पथक वार्जे, पुणे, महाराष्ट्र येथे रवाना झाले. त्यानंतर पथकाने पुणे येथील वार्जे मालवाडी पोलीस स्थानकातील पोलिसांच्या सहकार्याने सूरज याला ताब्यात घेऊन गोव्यात आणले. २५ जानेवारी रोजी त्याला अटक केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संस्थेच्या कलम २०४, ३३८, ३३६(३), ३४० (२), ३१९ (२), ३१८ (४) कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. या मोबाईल वरूनच अटक करण्यात आलेला सूरज हा बनावट कागदपत्रे तयार करून लोकांची फसवणूक करीत असल्याचा संशय तपास पथकाला आहे. अशाच पद्धतीने त्याने आणखी कोणाची फसवणूक करून पैसे लाटले का, याचा शोध घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या त्याच्याविरुद्ध गोव्यात ८ तर महाराष्ट्र, कर्नाटक येथे प्रत्येकी १ गुन्हा नोंद असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. 

तोतये मागत होते पैसे 

दरम्यान, गोव्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, कर्मचारी असल्याची बतावणी करून व बनावट कागदपत्रे तयार करून देऊन पैसे मागणारे व फसवणूक करणारे कार्यरत असल्याचे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सांगत होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, कर्मचारी असल्याची बतावणी करून लोकांना धमकी देवून पैसे उकळले जात होते. त्याचबरोबर बनावट कागदपत्रेही तयार करून देवून पैसे उकळले जात होते. यासंदर्भात त्यांनी पोलिसांतही तक्रार केली होती. त्याचबरोबर तोतया प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.  यासंदर्भात गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे व पोलिसांतही तक्रार करण्याचे आवाहन गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आले होते.   


हेही वाचा