राष्ट्रीय नेतृत्वाचा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना सल्ला

पणजी : केंद्रात व राज्यात भाजप (BJP) सरकारचा गैरकारभार व भ्रष्टाचार गोमंतकीय जनतेसमोर मांडण्याची गरज आहे. भ्रष्टाचार जनतेसमोर मांडतानाच संघटना मजबूत करून २०२७च्या विधानसभा निवडणुकीची (Election) तयारी करण्याचा सल्ला काँग्रेसच्या (Congress) राष्ट्रीय नेतृत्वाने प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना बैठकीत दिला.
काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक आज नवी दिल्लीत (New Delhi) झाली. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाचे नेते राहुल गांधी व सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी मार्गदर्शन केले. गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, काँग्रेस विधीमंडळ नेते युरी आलेमाव व गिरीश चोडणकर उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील राजकीय स्थिती व संघटनेवर चर्चा झाली, अशी माहिती प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीला आता एक वर्षाचा कालावधी आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय नेत्यांनी राज्यातील राजकीय स्थिती जाणून घेतली. गोव्यातील पक्षाच्या स्थितीचाही त्यानी आढावा घेतला. केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा गैरकारभार व भ्रष्टाचार जनतेसमोर प्रभावीपणे मांडण्याची आवश्यकता आहे. भ्रष्टाचारावर राज्यात मोठ्या प्रमाणात जागृती व्हायला हवी. यासाठी संघटनेतील विविध पदाधिकाऱ्यांना जबाबदारी द्यायला हवी. जनजागृती करण्यासह संघटना मजबूत करून जनतेचा विश्वास संपादन करण्याची गरज आहे. यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.