महाराष्ट्राच्या राजकारणातला 'दादा' गेला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
महाराष्ट्राच्या राजकारणातला 'दादा' गेला

पणजी: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत आक्रमक, स्पष्टवक्ते आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे नेते  अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. सकाळी ८:४५ वाजता लँडिंगच्या प्रयत्नात असताना त्यांचे 'लिअरजेट-४५' विमान कोसळले आणि त्यात स्वार असलेल्या पाचही जणांचा अंत झाला. या बातमीने संपूर्ण देशासह राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली असून, एका वादळी पर्वाचा असा अकाली अंत होईल, अशी कल्पना कोणीही केली नव्हती. ६५ वर्षांच्या अजित पवार यांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन भारतीय राजकारणात एक वेगळाच विक्रम प्रस्थापित केला होता.


Ajit Pawar: NCP to Contest Local Self-Government Elections Independently |  TheBridgeChronicle


अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. त्यांचे वडील अनंतराव पवार हे चित्रपट सृष्टीशी निगडित होते, मात्र वडिलांच्या निधनानंतर अजित पवार आपल्या काकांकडे म्हणजेच शरद पवार यांच्याकडे बारामतीला आले. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांच्या राजकारणाची शाळा सुरू झाली. १९८२ मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास १९९१ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि नंतर बारामतीचे खासदार इथपर्यंत पोहोचला. विशेष म्हणजे, १९९१ मध्ये खासदार झाल्यानंतर अवघ्या काही काळातच त्यांनी आपले काका शरद पवार यांच्यासाठी ती जागा रिकामी केली, जेणेकरून शरद पवार नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री होऊ शकतील. येथूनच अजित पवार यांची निष्ठा आणि कुटुंबातील त्यांचे स्थान अधोरेखित झाले होते.


Ajit Pawar's Family Tree: From Sharad Pawar, Rohit Pawar to Supriya Sule —  Who's Who in Maharashtra Politics | India News - Times Now


मात्र, २००९ नंतर पवार कुटुंबात आणि पक्षात वादाची पहिली ठिणगी पडली. सुप्रिया सुले यांची राजकारणात झालेली एन्ट्री आणि त्यानंतर अजित पवार यांना वाटू लागलेली असुरक्षितता यातून पक्षात दोन गट पडण्यास सुरुवात झाली. अजित पवार यांचे समर्थक नेहमीच असा आरोप करत राहिले की, पक्षाची सर्व कष्टाची कामे अजित दादांनी करायची आणि महत्त्वाची पदे मात्र काकांनी दुसऱ्यांना द्यायची. या असंतोषाचा उद्रेक २०१९ मध्ये सर्वांसमोर झाला. २३ नोव्हेंबर २०१९ ची ती पहाट महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही, जेव्हा राजभवनावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन देशाला धक्का दिला होता. तो ८० तासांचा सत्तासंघर्ष शरद पवार यांच्या एका फोन कॉलने फिरला आणि अजित पवार पुन्हा स्वगृही परतले. या 'घरवापसी'मध्ये त्यांच्या प्रतिभा पवार आणि बहीण सुप्रिया सुळे यांनी मोठी भूमिका बजावली होती.


Ncp Leader Ajit Pawar Interacts Dy Editorial Stock Photo - Stock Image |  Shutterstock Editorial


अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या कथित सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'चक्की पीसिंग'चा डायलॉग मारत त्यांच्यावर सडकून टीका केली होती, मात्र राजकारणात कोणीच कायमचा शत्रू नसतो, हे अजित पवार यांनी वारंवार सिद्ध केले. २०२३ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची साथ सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला दावा सांगत ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यावेळेस त्यांनी केवळ पदच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि 'घड्याळ' हे चिन्हही मिळवले. आपल्या राजकीय संघर्षात त्यांनी काका शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करत त्यांना निवृत्तीचा सल्ला दिला होता. हे विधान महाराष्ट्रात खूप चर्चेत राहिले.

From vowing to jail him, Fadnavis now has Ajit Pawar as deputy | India News  - Times of India


कौटुंबिक पातळीवर अजित पवार अत्यंत भावूक होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना बहीण सुप्रिया सुले यांच्या विरोधात उभे करण्याचा निर्णय ही आपली मोठी चूक होती, अशी कबुली त्यांनी जाहीरपणे दिली होती. राजकारण आणि कुटुंब यात नेहमीच त्यांची ओढाताण झाली, पण बारामतीची दिवाळी असो वा कौटुंबिक सोहळे, त्यांनी नेहमीच कुटुंबाशी नाळ टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये म्हणजे पहाटे सहा वाजता कामाला लागणे आणि अधिकाऱ्यांकडून तत्काळ निकाल मिळवणे.


Birthday buddies Devendra Fadnavis and Ajit Pawar prepare for crucial poll  battle | Mumbai news


आज त्यांच्या जाण्याने केवळ एका पदाचा मृत्यू झालेला नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असा नेता हरपला आहे ज्याच्या शब्दाला प्रशासनात वजन होते. बारामतीचा कायापालट करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. शेवटच्या क्षणीही ते आपल्या कर्मभूमीत, बारामतीत उतरण्याचा प्रयत्न करत होते, पण काळाने तिथेच घाला घातला. धावपट्टीपासून अवघ्या १०० फुटांवर त्यांचे विमान तांत्रिक बिघाडामुळे अनियंत्रित झाले आणि कोसळले. त्यांच्यासोबत असलेले सुरक्षा अधिकारी आणि विमान कर्मचारी यांचाही या घटनेत मृत्यू झाला. महाराष्ट्राच्या इतिहासात अजित पवार यांचे नाव एक 'किंगमेकर' आणि 'कार्यक्षम प्रशासक' म्हणून कायम कोरले जाईल. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबावर आणि राज्यावर कोसळलेले हे संकट न भरून येणारे आहे.


Beed: Banner featuring Ajit Pawar as future CM causes speculation in  political circles - www.lokmattimes.com

हेही वाचा