काँग्रेसचे राजस्थान प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा यांच्यासह १३५ प्रवाशांचा जीव टांगणीला

जयपूर: दिल्लीहून जयपूरला पोहोचलेल्या एअर इंडियाच्या 'AI-1719' या विमानाचा लँडिंगदरम्यान मोठा थरार पाहायला मिळाला. बुधवारी दुपारी धावपट्टीला स्पर्श करताच विमान पुन्हा हवेत झेपावल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. विशेष म्हणजे, या विमानात काँग्रेसचे राजस्थान प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा यांच्यासह एकूण १३५ प्रवासी स्वार होते. वैमानिकाने प्रसंगावधान राखत घेतलेल्या 'गो-अराउंड'च्या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

जयपूरमध्ये एअर इंडिया विमानाचे प्रथम लँडिंग फेल; १० मिनिटांनंतर दुसऱ्या लँडिंगच्या प्रयत्नात सुरक्षित उतरलेल्या रंधावांचे राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद डोटासरा यांनी विमानतळावर स्वागत केले.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास वैमानिकाने जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगचा पहिला प्रयत्न केला. मात्र, विमान धावपट्टीला टेकल्यानंतर 'अनस्टेबल अप्रोच' (Unstable Approach) लक्षात येताच, वैमानिकाने सुरक्षेला प्राधान्य देत तात्काळ विमानाची दिशा पुन्हा वर केली. हे विमान काही वेळ हवेतच घिरट्या घालत राहिले, यामुळे विमानातील प्रवाशांची धाकधूक आणखीनच वाढली. अखेर १० मिनिटांनंतर दुसऱ्या प्रयत्नात विमान धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

एअरपोर्ट सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या वेळी जर वैमानिकाला परिस्थिती सुरक्षित वाटत नसेल, तर विमान पुन्हा हवेत उडवणे हा सुरक्षा मानकांचाच एक भाग आहे. हे विमान 'एअरबस ३२० निओ' श्रेणीतील होते. यापूर्वीही जयपूर विमानतळावर अशा लँडिंग फेल होण्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने, वैमानिकाच्या अनुभवामुळे रंधावा यांच्यासह सर्व १३५ प्रवाशांचे प्राण वाचले असून, विमान सुरक्षित उतरताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान आज बारामती येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले. डीजीसीएचे पथक सध्या बारामतीमध्ये लँडिंग साईटजवळ दाखल झाले असून ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्याचे काम सुरू आहे.