पांझरखणी-कुंकळळी येथे भीषण अपघात; कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
पांझरखणी-कुंकळळी येथे भीषण अपघात; कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

मडगाव: कुंकळ्ळी येथील पांझरखणी भागात बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भरधाव कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका ५५ वर्षीय व्यक्तीला आपला प्राण गमवावा लागला. उल्हास कुष्ठा गावकर (रा. गावकरवाडा, पांझरखणी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हास गावकर हे आपल्या ॲक्टिवा स्कूटरवरून कुंकळ्ळीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एका भरधाव एर्टिगा कारने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर गंभीर जखमी झालेल्या गावकर यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी संबंधित कार चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक किशोर वेळीप या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी रस्ता सुरक्षेवरून पोलिसांना जाब विचारला. हॉट मिक्सिंगच्या कामावेळी या ठिकाणचे रम्बलर (गतीरोधक) काढण्यात आले होते, त्यामुळे वाहनांचा वेग वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या परिसरात तातडीने बायपास रस्ता तयार करावा आणि वाढत्या अपघातांवर आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


हेही वाचा